इंग्लंडने भारताला 124 धावांवर रोखले
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
फलंदाजीतील हाराकिरीनंतर भारतीय क्रिकेट संघाला येथील पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. प्रारंभी, आघाडीवीरांच्या सपशेल निराशेनंतर भारताला 20 षटकात 7 बाद 124 धावा करता आल्या तर प्रत्युत्तरात इंग्लंडने 15.3 षटकात केवळ 2 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य सहजपणे गाठले.
विजयासाठी 125 धावांचे तुलनेने अतिशय माफक आव्हान असताना जेसॉन रॉय (49), जोस बटलर (28) यांनी 8 षटकात 72 धावांची सलामी देत निम्यापेक्षा अधिक अंतर सहजपणे कापून काढत विजयाची भक्कम पायाभरणी केली तर डेव्हिड मलान (नाबाद 24), जॉनी बेअरस्टो (नाबाद 26) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण करत त्यावर उत्तम कळस चढवला. भारताने या लढतीत अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याचा प्रयोग राबवण्यासाठी रोहितला विश्रांती दिली. पण, गोलंदाजीने देखील भारताचा घात केला.
प्रारंभी, शिखर धवन (4), केएल राहुल (1), विराट कोहली (0) हे आघाडीचे तिन्ही शिलेदार एकेरी धावसंख्येवर बाद झाल्यानंतर येथील पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताला 7 बाद 124 अशा अतिशय किरकोळ धावसंख्येवर रोखण्यात यश प्राप्त केले. पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या श्रेयस अय्यरने 48 चेंडूत 67 धावांची आतषबाजी करत एकाकी झुंज दिली. त्याच्याशिवाय रिषभ पंत (23 चेंडूत 21) व पंडय़ा (21 चेंडूत 19) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील सामन्यात अय्यरने 8 चौकार व एका षटकाराची आतषबाजी केली व याचमुळे भारताला सव्वाशेहे धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडतर्फे जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरने 23 धावात 3 बळी घेतले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला पाचारण केल्यानंतर दुसऱयाच षटकात भारताला केएल राहुल बाद झाल्याने पहिला जोरदार धक्का बसला. आर्चरच्या प्रतितास 114 किमी वेगातील चेंडूवर राहुलने आक्रमक फटका लगावण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटची कड घेऊन ऑफस्टम्पवर आदळल्याने केएलची खेळी संपुष्टात आली.
कर्णधार विराट कोहलीचे डावातील तिसऱयाच षटकात बाद होणे भारताला आणखी खाईत लोटणारे ठरले. विराटने रशिदच्या गोलंदाजीवर मिडऑफवरील जॉर्डनकडे लॉलीपॉप झेल दिला. डावखुऱया धवनने काही फटके आत्मविश्वासाने लगावले. पण, नंतर डावातील 6 व्या षटकात शेवटच्या चेंडूवर त्याचीही एकाग्रता भंगली. मार्क वूडचा प्रतितास 148 किमी वेगातील चेंडू धवनने ऍक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्रिफळाचीत होत त्याला परतावे लागले.
पॉवर प्लेमध्ये भारत 3 बाद 22
आघाडीचे फलंदाज अतिशय स्वस्तात बाद होत राहिल्याने भारताला या पहिल्या टी-20 लढतीत 6 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये अवघ्या 22 धावांमध्येच 3 फलंदाज गमवावे लागले. आघाडीवीरांच्या या अपयशामुळे भारताला पॉवर प्लेमध्ये फटकेबाजीचे इरादे अक्षरशः बासनात गुंडाळून ठेवावे लागले होते.
रिषभही लवकरच तंबूत
ऑस्ट्रेलियन भूमीतील पराक्रमामुळे क्रिकेटप्रेमींच्या गळय़ातील ताईत बनलेल्या सनसनाटी फलंदाज रिषभ पंतने येथे 2 चौकार व 1 षटकारासह आक्रमक फलंदाजीचे इरादे स्पष्ट केले. पण, मोक्याच्या क्षणी चुकीचा फटका लगावत आपली विकेट फेकण्याची पुनरावृत्ती त्याने येथे आणखी एकदा केली. स्टोक्सच्या पॅडवरील चेंडू सीमापार पिटाळून लावण्याचा पंतचा प्रयत्न होता. पण, डीप स्क्वेअरलेगवरील बेअरस्टोचा अडथळा त्याला ओलांडता आला नसल्याचे स्पष्ट झाले. पंत बाद झाला, त्यावेळी भारताची 10 षटकात 4 बाद 48 अशी दैना उडाली होती.
अनुभवी मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने संघ अडचणीत असताना संयमी, धीरोदात्त खेळीवर भर दिला. अय्यरला अष्टपैलू हार्दिक पंडय़ाची देखील उत्तम साथ लाभली. पंडय़ा नंतर आर्चरच्या डावातील 17 व्या षटकात ऑफ साईड रिंगवरुन मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. मिडऑफवरील जॉर्डनने त्याचा झेल टिपला. पुढील चेंडूवरच शार्दुल ठाकुरही खाते न उघडता डेव्हिड मलानकडे झेल देत बाद झाला.
त्यानंतर श्रेयस अय्यर व हार्दिक पंडय़ा यांनी या जोडीने 5 व्या गडय़ासाठी 54 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली.
इंग्लंडचा सहज विजय
विजयासाठी 125 धावांचे किरकोळ आव्हान समोर असताना इंग्लिश आघाडीवीर फलंदाजांनी भारताच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजावर अगदी तुटून पडण्याचा सिलसिलाच सुरु केला आणि यात भारतीय गोलंदाज चांगलेच हतबल झाले. उभय संघातील दुसरी टी-20 उद्या (दि. 14) होईल.
धावफलक
भारत ः शिखर धवन त्रि. गो. मार्क वूड 4 (12 चेंडू), केएल राहुल त्रि. गो. आर्चर 1 (4 चेंडू), विराट कोहली झे. जॉर्डन, गो. रशिद 0 (5 चेंडू), रिषभ पंत झे. बेअरस्टो, गो. स्टोक्स 21 (23 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), श्रेयस अय्यर झे. मलान, गो. जॉर्डन 67 (48 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), हार्दिक पंडय़ा झे. जॉर्डन, गो. आर्चर 19 (21 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), शार्दुल ठाकुर झे. मलान, गो. आर्चर 0 (1 चेंडू), वॉशिंग्टन सुंदर नाबाद 3 (3 चेंडू), अक्षर पटेल नाबाद 7 (3 चेंडूत 1 चौकार). अवांतर 2. एकूण 20 षटकात 7 बाद 124.
गडी बाद होण्याचा क्रम
1-2 (केएल राहुल, 1.2), 2-3 (विराट, 2.3), 3-20 (धवन, 4.6), 4-48 (रिषभ, 9.6), 5-102 (पंडय़ा, 17.2), 6-102 (शार्दुल, 17.3), 7-117 (श्रेयस, 19.3).
गोलंदाजी
आदिल रशिद 3-0-14-1, जोफ्रा आर्चर 4-1-23-3, मार्क वूड 4-0-20-1, ख्रिस जॉर्डन 4-0-27-1, बेन स्टोक्स 3-0-25-1, सॅम करण 2-0-15-0.
बॉक्स
अश्विनची टी-20 संघातून उचलबांगडी?
आघाडीचा फिरकी अष्टपैलू रविचंद्रन अश्विनऐवजी वॉशिंग्टन सुंदरला आपली प्रथम पसंती असेल, असे कर्णधार विराट कोहलीने या सामन्यापूर्वी स्पष्ट केले असून यामुळे अश्विनची टी-20 संघातून कायमची उचलबांगडी झाली का, याचे उत्तर येत्या काही सामन्यात मिळू शकेल. वॉशिंग्टन सुंदर ऑफस्पिन गोलंदाज अष्टपैलू असून त्याला टी-20 मध्ये आपले प्राधान्य असेल, असे विराटने तूर्तास म्हटले आहे.
बॉक्स
गोलंदाजांची पारख करण्यासाठी रोहित शर्माला आश्चर्यकारक विश्रांती
आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, इंग्लंडविरुद्ध ही शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका असल्याने भारतीय संघ यात काही प्रयोग करुन पाहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून रोहित शर्माला विश्रांती देत एक अतिरिक्त गोलंदाज खेळवला. मात्र, सलामीला पाचारण केले गेलेले धवन व केएल राहुल हे दोन्ही फलंदाज अपयशी ठरल्याने भारताला फलंदाजीच्या आघाडीवर या प्रयोगाचा फटका बसला.
बॉक्स
रिषभ पंतचा अँडरसननंतर आता आर्चरविरुद्ध हल्लाबोल!
यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये जेम्स अँडरसनसारख्या जलद गोलंदाजाविरुद्ध रिव्हर्स स्वीपचा अफलातून फटका खेळलेल्या रिषभ पंतने शुक्रवारी येथे जोफ्रा आर्चरच्या वेगवान चेंडूवर रिव्हर्स स्कूपचा अविश्वसनीय फटका खेळत षटकार वसूल केला आणि अवघे क्रिकेट वर्तुळ यावर अक्षरशः थक्क झाले. पंतने यावेळी यष्टीपासून दूर होत चेंडू टप्प्यात येण्याची प्रतीक्षा केली आणि अगदी अंतिम क्षणी रिव्हर्स स्कूपचा फटका प्रत्यक्षात साकारत चेंडूला थर्डमॅनच्या दिशेने षटकारासाठी पिटाळून लावले!