सेन्सेक्स 487 तर निफ्टीत 143.85 अंकांची घट
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात भारतीय भांडवली बाजारात तीन दिवसांच्या सत्रात तेजीची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने शेअर बाजार बंद राहिला होता. त्यामुळे एक दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय शेअर बाजारात नफा कमाईच्या वातावरणामुळे बीएसई सेन्सेक्स 487 अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे.
दिवसभरातील कामगिरीच्या दरम्यान वाहन आणि बँकिंग क्षेत्रातील समभाग विक्रीमुळे बाजाराच्या सलगच्या तेजीला पूर्ण विराम मिळाला आहे. दिवस अखेर सेन्सेक्स 487.43 अंकांनी घसरुन निर्देशांक 50,792.08 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 143.85 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 15,030.95 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख निर्देशांकांपैकी 30 मधील 26 समभागांत घसरण राहिली, यामध्ये बजाज ऑटोचे समभाग सर्वाधिक 3.1 टक्क्यांनी घसरले आहेत. दुसऱया बाजूला पॉवरग्रिडचे समभाग 2.3 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले आहेत.
मजबूत नफा कमाईच्या प्रभावामुळे निर्देशांकात 1 टक्क्यांपेक्षा अधिकची घसरण झाली. यासोबतच देशामधील काही निवडक राज्यांमध्ये पुन्हा नव्याने वाढत जाणाऱया कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे शेअर बाजारात विमा कंपन्यांच्या समभागात मोठय़ा प्रमाणात नफा कमाई झाली असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.
बीएसईमध्ये 3,185 समभागांमध्ये ट्रेडिंग झाले असून यामध्ये 1,352 समभाग वाढीमध्ये तर 1,656 समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 207.88 लाख कोटी रुपयांवर राहिले आहे. जे 10 मार्च रोजी 209.18 लाख कोटी रुपयांवर राहिले होते.
वाहन-बँकिंगमधील विक्री
दिवसभरामध्ये वाहन आणि बँकिंग समभागांची विक्री सर्वाधिंक झाली आहे. निफ्टीमधील बँकेचा निर्देशांक 441 अंकांनी घसरुन निर्देशांक 35,496.65 वर बंद झाला आहे. यासोबत वाहन क्षेत्राचा निर्देशांक 1.7 टक्क्यांनी घसरणीत राहिला आहे.