फलटण / प्रतिनिधी :
आसू (ता.फलटण) येथे एका तरुणाचा गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) या व्हायरसमूळे मृत्यू झाला आहे. अशा प्रकारची ही फलटणमधील पहिलीच घटना असून, आरोग्य यंत्रणेसह सर्वजण चक्रावले आहेत.
शिवराज स्वामीनाथ साबळे (वय 18) याला एक महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. या आजारातून बरा झाल्यानंतर दोन दिवसांनी त्याला अशक्तपणा आला. त्यानंतर प्रकृती खालावत असल्याने त्याला पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याला जीबीएस व्हायरसची लागण झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने सध्या डोके वर काढले आहे. हा व्हायरस शरीरात घुसून थेट रक्तवाहिनी, स्नायूवर हल्ला करत असल्याने हातापायातील ताकद जाऊन अंग लुळे पडण्याची लक्षणे असणारे अनेक रुग्ण आढळले आहेत. योग्य औषधोपचाराने हा रोग आटोक्यात येत असला तरी खर्चिक उपचारामुळे रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीस येत आहेत.