प्रतिनिधी/ फलटण
माढा लोकसभा मतदार संघाचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याने रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या सोयीसाठी फलटण ते पुणे आणि परती साठी डेमु रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या रेल्वे चा उद्घाटन सोहळा केंद्रीय रेल्वेमंत्री ना.पियुष गोयल यांच्या शुभहस्ते होणार असलेची माहिती खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. फलटण-पुणे दरम्यान अनारक्षित डब्यांची ही नियमित डेमू सेवा बुधवार 30 मार्च पासून प्रत्यक्षात सुरू होणार असल्याने माजी खासदार स्व.लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद त्यांचे कुटुंबीय व फलटण करांमध्ये होत आहे.
दरम्यान या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय मंत्री ना.प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार,पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील,विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस, खा.गिरीश बापट, खा.सुप्रिया सुळे, खा.श्रीनिवास पाटील,खा.शरद पवार, खा.छत्रपती उदयनराजे भोसले, खा.वंदना चव्हाण,भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील, आ.दीपक चव्हाण,आ.सुनील कांबळे,व नगराध्यक्षा नीता नेवसे उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी मंगळवारी 30 मार्च रोजी याच मार्गावर उद्घाटन विशेष गाडी चालविण्यात येणार असून या विशेष गाडीचे उद्घाटन माननीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून फलटण स्टेशन येथून गाडी रवाना केली जाईल. ही गाडी सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी व सासवड रोड स्टेशनवर थांबेल.
अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी फलटण- पुणे अनारक्षित डेमु गाडीची नियमित सेवा बुधवार 31 मार्चपासून सुरू होईल.गाडी क्रमांक 01435 पुणे येथून 05.50 वाजता सुटेल व 09.35 वाजता फलटणला पोहोचेल व परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01436 फलटण येथून 18.00 वाजता सुटेल व पुणे येथे 21.35 वाजता पोहोचेल. ही गाडी सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी व सासवड रोड स्टेशनवर थांबेल. रविवारी ही सेवा बंद राहील.असे सांगितले आहे.
राज्य शासनाने स्थानिक प्रशासकीय स्तरावर अत्यावश्यक सेवेतील संबंधित लोकांना फलटणचे प्रांत अधिकारी यांच्याकडून क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे / पास दिले जातील व पुणे पोलिस आयुक्त यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे जे संपूर्ण प्रक्रिया पुर्ण करून क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे / पास जारी करतील. प्रांत अधिकारी फलटण व पोलीस आयुक्त पुणे अत्यावश्यक सेवेतील लोकांची ओळख पटवून त्यांना ओळख पत्र जारी करतील ही ओळखपत्रे क्यू आर कोड आधारित/ पास आधारित असतील.
अत्यावश्यक सेवेतील लोक स्टेशन वर क्यू आर कोड आधारित ओळखपत्र/पास दाखवून तिकीट खरेदी करून प्रवास करू शकतात.असे रेल्वे अधिकायांनी सांगितले.
तहसील कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील लोकांना क्यूआर कोड ची संपूर्ण माहिती व इतर माहिती दिली जाणार असून त्या साठी एक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.- समीर यादव तहसीलदार फलटण