क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज मंगळवारी फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर बेंगलोर एफसीची गाठ एटीके मोहन बागानशी पडेल. गेल्या चार सामन्यांत अपराजित राहिलेल्या आणि मागील दोन सामन्यांत क्लीन शीट राखलेल्या बेंगलोरचा सकारात्मक फॉर्म कायम राखण्याचा निर्धार असेल. बेंगलोर एफसीचे 16 सामन्यांतून 19 गुण तर एटीके मोहन बागानचे 15 सामन्यांतून 30 गुण झाले
आहेत.
हंगामी प्रशिक्षक नौशाद मुसा यांच्याकडे सूत्रे आल्यानंतर बेंगलोर संघात समन्वय निर्माण झाला. आम्ही याक्षणी एटीके मोहन बागानविरुद्धच्या लढतीवर लक्ष केंद्रीत केले असून, कसे खेळायचे याची आम्हाला कल्पना असल्याचे मुसा म्हणाले. आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू. आमच्या खेळाडूंचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि प्रत्येक जण सर्वोत्तम प्रयत्न करतो आहे, असे मुसा म्हणाले.
दोन क्लीन शीटमध्ये गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याच्या चमकदार कामगिरीचा मोठा वाटा होता. चेन्नईन एफसीविरुद्ध त्याने संघावर होणारे किमान सहा गोल वाचविले. एटीके मोहन बागानविरुद्ध मात्र आपल्यासंघाला संघटीत राहावे लागेल आणि सारे काही गोलरक्षकावर सोपवून चालणार नाही यावर मुसा यांनी भर दिला.
एटीके मोहन बागानचा खेळ बघता गोल पत्करावा लागल्यानंतरही ते गोल करत आहेत. याबाबतीत आम्हाला दक्ष राहावे लागेल. आम्हाला आणखी संघटित राहावे लागेल. महत्वाची बाब म्हणजे गोल पत्करून चालणार नाही, कारण ते केव्हाही गोल करू शकतात हे आम्हाला ठाऊक आहे, असे मुसा म्हणाले. एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक आंतोनियो हबास यांच्याविरूद्ध बेंगलोरचे रेकॉर्ड खराब राहिले आहे, पण आपल्या संघावर दडपण नसेल असे मुसा यांनी स्पष्ट केले.
एटीकेने आपले दुसरे स्थान भक्कम केले आहे. आघाडीवरील मुंबई सिटी एफसीपेक्षा ते तीन गुणांनी मागे आहेत. जिंकल्यास ते मुंबई सिटीला गुणांवर गाठतील. आकडेवारीच्या समीकरणानुसार बाद फेरीतील स्थान निश्चित करणे आमचे ध्येय आहे. त्यानंतर आम्ही अव्वल स्थानासाठी प्रयत्न करू असे हबास म्हणाले. त्यानंतर उपान्त्य फेरी आणि मग शक्य झाल्यास अंतिम फेरी असे धोरण असल्याचे ते म्हणाले.
आधीच्या लढतीत एटीके मोहन बागान संघाने ओडिशा एफसीविरुद्ध 4-1 असा दणदणीत विजय मिळविला. त्यात दोन गोलांचा वाटा उचललेल्या मानवीर सिंग याला कायम ठेवण्यास हबास यांची पसंती असेल. त्याने केलेला पहिला गोल उच्च दर्जाचा होता. कार्ल मॅकहय़ुज बेंगलोर एफसीविरुद्धच्या सामन्यात उपलब्ध असेल मात्र, प्रणोर हलदर निलंबित असेल.