मडगाव : आय-लीग फुटबॉल स्पर्धेत काल कोलकातात कल्याणी स्टेडियमवर खेळविण्यात आलेला चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लब आणि रियल काश्मीर एफसी यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत संपली. या निकालाने दोन्ही संघांना समान एक गुण प्राप्त झाला.
चर्चिल ब्रदर्स क्लबचे आता 7 सामन्यांतून 13 गुण झाले असून ते पहिल्या स्थानावर आहेत. सहा सामने खेळलेल्या रियल काश्मीरचे 10 गुण झाले असून ते दुसऱया स्थानावर आहेत. त्यापूर्वी दुपारी विवेकानंद युवा भारती स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबने गोकुळम केरळचा 2-1 गोलांनी पराभव केला. मोहम्मेडनसाठी अशीर अख्तरने दोन्ही गोल केले तर गोकुळम केरळचा एकमेव गोल शरीफ मुखमद्दने केला. तीन गुणांनी मोहम्मेडन स्पोर्टिंगचे 6 सामन्यांतून 10 तर गोकुळम केरळचे 7 गुण झाले आहेत. आज मंगळवारी या स्पर्धेत नॅरोका एफसी विरूद्ध चेन्नई सिटी एफसी, इंडियन ऍरोज विरूद्ध पंजाब एफसी आणि तिड्डीम रोड ऍथलेटीक युनियन आणि ऐजॉल एफसी यांच्यात सामने खेळविण्यात येतील.