परप्रांतियांसह अन्य जिल्हय़ातील लोकांचा समावेश : तीनशेहून अधिकजणांची तपासणी
वार्ताहर / कुडाळ:
लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्गात अडकलेल्यांना आपापल्या जिल्हय़ात व राज्यात पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर रविवारी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ मिळविण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात परप्रांतियांनी गर्दी केली होती.
परप्रांतियांसह अन्य जिल्हय़ात जाणारे काही फिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयात आले. दिवसभरात तीनशेहून अधिकजणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
लॉकडाऊनमुळे आपापल्या जिल्हय़ात तसेच राज्यात जाणारे येथे अडकून पडले आहेत. यात परप्रांतीय मजूर, प्रवासी, पर्यटक व विद्यार्थी यांचा समावेश आहे. काही अधिकारी-कर्मचारी सुट्टी असल्याने आपापल्या मूळ गावी जाण्यास इच्छुक आहेत. अशा लोकांना त्यांचा जिल्हा तसेच राज्यात जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार सिंधुदुर्गातून बाहेर जाणाऱया लोकांची यादी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या लोकांची वैद्यकीय तपासणी करून सक्षम असणाऱयांनाच जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.
अन्य जिल्हा व राज्यात जाणाऱया लोकांनी वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. येथील ग्रामीण रुग्णालयात आज परप्रांतीय कामगारांनी फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी गर्दी केली होती. कर्नाटक राज्यात जाणाऱया कामगारांचा भरणा जास्त होता. ते आपल्या कुटुंबियांसह रुग्णालयात दाखल झाले होते. येथून अन्य जिल्हय़ात जाणाऱयांनीही आरोग्य तपासणी करून घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव घुर्ये यांनी सहकाऱयांच्या मदतीने तीनशेहून अधिकजणांची तपासणी केली.