पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कर्णधार विराट कोहलीचं कौतुक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पॅरालिंपियन देवेंद्र झाझरिया यांच्याशी गुरुवारी संवाद साधला आहे. या ऑनलाईन परिषदेत मॉडेल मिलिंद सोमण, प्रसिद्ध आहारतज्ञ रुजुता दिवेकर हे देखील सामील झाले होते. सर्वांनी तंदुरुस्तीबाबत स्वतःचा प्रवास आणि निरोगी जीवनातील गुणांबद्दल मत मांडून काही सूचनाही केल्या आहेत.
स्वतःच्या खांद्याला झालेल्या दुखापतीला व्यायामाच्या मदतीने ठिक केल्याचे देवेंद्र यांनी सांगितले आहे. खांद्यासाठी अनेक कसरती करत असल्याचेही म्हटले आहे.
नाव अन् कर्तृत्वही विराट
फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मोदींनी विराट कोहलीची प्रचंड प्रशंसा केली आहे. तुमच तर नाव आणि काम दोन्हीही विराट आहे असे मोदींनी त्याला उद्देशून म्हटले आहे. फिट इंडिया मोहिमेचा फायदा सर्वांनाच होत आहे. खेळाची गरज फार वेगाने बदलत असल्याने फिटनेसला प्राथमिकता असायला हवी. आज फिटनेस सेशन चुकल्याने वाईट वाटत असल्याचे विराटने यावेळी म्हटले आहे.
मोदींनी केली गंमत
पंतप्रधान मोदींनी अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणच्या वयावरून गंमत केली आहे. मिलिंद मला तुम्हाला तुमच वय जे ऑनलाईन दाखवलं जाते ते खर आहे का असे विचारायचे आहे असे मोदींनी म्हणताच मिलिंदच्या चेहऱयावर हास्य उमटले. तुमच वय खरच 55 आहे का असे अनेक जण मला विचारतात. फिट इंडिया मोहीम कौतुकास्पद असल्याचे उद्गार मिलिंद यांनी काढले आहेत.
हळदीचा आहारात समावेश
पंतप्रधानांनी प्रसिद्ध आहारतज्ञ रुजुता दिवेकर यांच्याशी बातचीत केली आहे. कोरोना विषाणूच्या संकटकाळात आईशी 2 ते 3 वेळा बोलण्याचा प्रयत्न करतो. फोन केल्यावर आई नेहमी हळद आहारात घेतोस की नाही, असे विचारत असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे.