वृत्तसंस्था/ मनीला
फिलिपाईन्सचे अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते यांनी पुढील वर्षी होणाऱया निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी दावेदारी करण्याच्या स्वतःच्या जुन्या घोषणेपासून मागे हत असल्याचे म्हटले आहे. तसेच अध्यक्षपदाचा कार्यकाळ समाप्त झाल्यावर राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
दुतेर्ते यांनी स्वतःचे सहकारी सिनेटर बोंग गो यांच्या उपसिथतीत शनिवारी ही चकित करणारी घोषणा केली आहे. दुतेर्ते यांच्याऐवजी गो यांनी उपाध्यक्षपदासाठी स्वतःचा अर्ज भरला आहे.
फिलिपाईन्सच्या अध्यक्षांचा कार्यकाळ घटनेद्वारे 6 वर्षांच्या कार्यकाळापुरती मर्यादित आहे. यामुळे दुतेर्ते उपाध्यक्षपद मिळवू पाहत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.
दुतेर्ते यांनी 2016 मध्ये अध्यक्षपद स्वीकारले होते. तसेच अमली पदार्थांच्या तस्करांच्या विरोधात मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत 6 हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. या मोहिमेवरून पाश्चिमात्य देश आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी टीकेची झोड उठविली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालय या प्रकरणी चौकशी करत आहे.