प्रतिनिधी / पणजी
काँग्रेस पक्षातून फुटून भारतीय जनता पक्षात विलीन झालेल्या 10 आमदारांना पात्र ठरवणारा सभापती राजेश पाटणेकर यांच्या निवाडय़ाला आव्हान देणाऱया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या आव्हान याचिकेवर सुनावणी आता मुंबई येथे येत्या आठवडय़ापासून होणार असून विशेष म्हणजे त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या खास खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती कमलकिशोर कपूरचंदजी तातेड आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांचे खास न्यायपीठ स्थापन करण्यात आले आहे. या याचिकेवर येत्या आठवडय़ापासून सुनावणी होण्याची शक्यता असून सोमवार दि. 19 जुलै रोजी मुंबई येथील उच्च न्यायालयाची कामकाजाची सूची जाहीर होणार आहे.
जलद सुनावणीची शक्यता
मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती के. के. तातेड उच्च न्यायालयात 2008 पासून न्यायमूर्ती आहेत व घटनात्मक सुनावणीचा त्यांचा हातखंडा असल्याचे मानले जाते. 1959 साली जन्मलेले न्या. तातेड येत्या 18 सप्टेंबर 2021 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे अपात्रता आव्हान याचिकेवरील सुनावणी सप्टेंबर 2021 मध्ये पूर्ण होणार असून या याचिकेवर जलद सुनावणी होण्याची शक्यता आहे.
न्या. सोनक यांनी सुनावणी नाकारली
सभापती राजेश पाटणेकर यांनी 10 आमदारांना पात्र ठरविण्याचा निवाडा दिल्यानंतर लगेच काँगेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सदर याचिका सुनावणीस आली तेव्हा न्या. महेश सोनक यांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. या याचिकेत प्रतिवादी असलेल्या 10 आमदारांपैकी काही आमदार यापूर्वी आपले अशील होते. त्यामुळे या याचिकेवर आपण सुनावणी घेणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट करुन त्यांनी याचिका आपल्यासमोर नको, असा शेरा मारुन सुनावणीस नकार दिला होता.
खास खंडपीठाची मागणी
न्या. सोनक यांचा समावेश नसलेले द्विसदस्यीय खंडपीठ स्थापन झाल्यानंतर सदर याचिकेवर सुनावणी होणार होती. दरम्यान, याचिकादार गिरीश चोडणकर यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहून खास खंडपीठाची नियुक्ती करावी, अशी विनंती केली होती.
इतर याचिकाही मुंबईला
न्या. सोनक यांनी सुनावणीसाठी नाकारलेल्या इतर सर्व याचिका मुंबईला वर्ग करण्यात आल्या आहेत. त्या वेगवेगळ्य़ा न्यायपीठापुढे सुनावणीस येण्याची शक्यता आहे.
सुदिन ढवळीकरांचे आव्हान नाही
सभापती राजेश पाटणेकर यांनी गिरीश चोडणकर यांची अपात्रता याचिका फेटाळतानाच आमदार सुदिन ढवळीकर यांची याचिका फेटाळली होती. मगो पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या मनोहर उर्फ बाबू आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांना सभापतींनी पात्र ठरविले होते. या निवाडय़ाला सुदिन ढवळीकर यांनी अजून आव्हान दिलेले नाही.
..तर सहा वर्षांसाठी अपात्र
मुंबई उच्च न्यायालयासमोर न्यायप्रविष्ठ असलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणी महत्त्वाची असून जर गिरीश चोडणकर यांच्या बाजूने निवाडा लागला आणि 10 आमदार अपात्र ठरले तर ते 6 वर्षांसाठी अपात्र ठरणार आहेत. विधानसभेच्या पुढील निवडणुका 6 महिन्यानंतर कधीही जाहीर होऊ शकतात. ती निवडणूक लढविण्यासाठी या 10 आमदारांना पात्र राहिले पाहिजे अन्यथा ते निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरतील.