प्रतिनिधी / फोंडा
फोंडा तालुक्यातील विविध शिव मंदिरांमध्ये गुरुवारी महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. अभिषेक व देवदर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मंदिरांमध्ये रेलचेल सुरु होती. काही मंदिरांमध्ये भाविकांना स्वहस्ते अभिषेक व बेलपत्र वाहण्याची सोय करण्यात आली होती.
मंगेशी येथील श्री मंगेश, नागेशी येथील श्री नागेश महारुद्र, श्री कपिलेश्वर महादेव या मोठय़ा मंदिरांसह तालुक्याच्या विविध गावातील अन्य छोटय़ा मोठय़ा मंदिरांमध्ये सकाळपासून अभिषेक व अन्य धार्मिक विधी पार पडले. कोरोना महामारीमुळे काही मंदिरात मर्यादित स्वरुपात हा उत्सव साजरा करण्यात आला. बोरी येथील प्रसिद्ध सिद्धनाथ पर्वतावरील स्वयंभू शिव मंदिरात भाविकांसाठी अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आगापूर येथील पुरातन अशा माधव गोविंद रामेश्वर मंदिरात तसेच खांडेपार नदी तिरावरील प्राचीन सप्तकोटेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावून शिवपिंडीकेवर दुग्धाभिषेक व बेलपत्रे वाहिली. मंगेशी, नागेशी व अन्य काही मंदिरात धार्मिक विधी सोडून मर्यादित स्वरुपात महाशिवरात्रोत्सव साजरा करण्यात आला.