आंबे, मासळी विक्रेत्यांना पोलिसांनी पिटाळले
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा शहर व शेजारील कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रात काल बुधवारपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनला व्यापाऱयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्य बाजारपेठ व शहराच्या विविध भागातील सर्व दुकाने व अन्य व्यवहार दिवसभर बंद राहिले. बुधवारचा आठवडा बाजार बंद ठेऊन बुधवारपेठेतील व्यापाऱयांनीही लॉकडाऊनला सहकार्य केले. सकाळच्या वेळी काही परप्रांतीय आंबे विक्रेते व मासळी विक्रेत्यांनी व्यापार थाटल्याने लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांना हस्तक्षेप करीत त्यांना पिटाळून लावावे लागले.
फोंडा भागात कोरोना महामारीचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन फोंडा नगरपालिका आणि फोंडा बिझनेसमन ऍण्ड प्रोफेशनल फोरम या व्यापारी संघटनेने सोमवापर्यंत स्वेच्छा लॉकडाऊनसाठी व्यापाऱयांना आवाहन केले आहे. फोंडा शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी 7 ते 10 वा. पर्यंत दुकाने खुले ठेवण्याची मुभा आहे. त्यामुळे सकाळीच्यावेळी शहरात किंचित वर्दळ दिसून आली. त्यानंतर पूर्णदिवस वातावरण सामसूम होते. सायंकाळी कामावरुन घरी परतणाऱया प्रवाशांची जुन्या बसस्थानकावरील किंचित गर्दी व तुरळक वाहतूक सोडल्यास सायंकाळच्यावेळी गजबजणारे फोंडा शहर पूर्णपणे सामसूम होते. औषधालये, बँका, दवाखाने तेवढे पूर्णदिवस खुले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेतील भाजी, फळे व फुलबाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. मासळी व चिकन मार्केटमधील काही विक्रेत्यांनी व्यावहार सुरु ठेवल्याचे आढळल्यानंतर व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी बुधवारी सायंकाळी बाजारात फेरफटका मारुन लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे त्यांना आवाहन केले आहे. फोंडा शहरात सोमवारपर्यंत हे स्वच्छा लॉकडाऊन सुरु राहणार आहे.
कुर्टी पंचायत क्षेत्रातही पूर्ण लॉकडाऊन
शेजारील कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रात सोमवार 10 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. कुर्टी पंचायतीच्या या निर्णयाला पाठिंबा देत व्यापाऱयांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेऊन लॉकडाऊनला सहकार्य केले आहे. हवेली, नागामशीद, बाजारमळ या नेहमीच गजबजलेल्या वस्त्यांमध्येही बहुतेक दुकाने दिवसभर बंद होती. या भागात परप्रांतीय मजूर मोठय़ा प्रमाणात भाडेकरु म्हणून वास्तव्यास आहेत. सकाळी कामावर बाहेर पडताना व सायंकाळी कामावरुन घरी परतताना वारखंडे-फोंडा व कुर्टी पंचायत क्षेत्रातील विविध नाक्यांवर त्यांची गर्दी असते. चहा, वडापाव खाण्यासाठी सायंकाळी घोळक्याने थांबणाऱया या मजुरांचे अड्डेही बुधवारच्या दिवशी सामसूम होते.