प्रतिनिधी / पणजी
बांबोळी येथील सुपर स्पेशालिटी विभाग (ब्लॉक) कोरोना रुग्णांसाठी खुला करण्यात आला असून तेथे 150 खाटांची सोय झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
दोन्ही मंत्र्यांच्या हजेरीत हा विभाग सुरू करण्यात आला. कोरोना रुग्णांना खाटी मिळत नसल्याने सरकारने हे पाऊल उचलले असून आता त्या विभागात कोरोना रुग्णांना प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. तेथील दोन मजले कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आले असून त्या सर्व 150 खाटींना ऑक्सिजनची सोय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व सरकारी हॉस्पिटल कोरोना रुग्णांनी हाऊसफूल्ल झाल्यामुळे शेवटी सरकारला खाटी वाढवण्यासाठी सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करणे भाग पडले आहे. तेथील सर्व 150 खाटींना पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवण्यात येणार असून गोमेकॉतील कोरोना रुग्णांना तेथे हलवले जाणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
राज्यातील 18 ते 45 वयोगटातील लोकांना विनामुल्य कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याचे सांगून मणिपाल हॉस्पिटलने त्या लसीची खरेदी थेट केल्याने तेथे पैसे आकारले जात आहेत, असा दावा डॉ. सावंत यांनी केला. गोव्यासाठी 5 लाख डोसांची विनंती करण्यात आली असून तो साठा आला की 18 वर्षावरील ते 45 वर्षापर्यंतच्या लोकांना देण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्या लसीकरीता पैसे आकारले जाणार नाहीत. ती सरकारी आरोग्य केंद्रातून विनाशुल्क देण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
कोरोना महामारीच्या काळातही विरोधी पक्ष त्यांचे आमदार राजकारणाची खेळी करीत असून ती चुकीची आहे. लोकांच्या हितासाठी सरकार कार्यरत असून विरोधी पक्षांच्या लॉकडाऊन व इतर मागण्यांवर भाष्य करायचे नाही, असे त्यांनी नमूद केले. सेसा, वेदांता, सिमेन्स यांनी सुमारे 200 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्याचे ठरविले असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.