प्रतिनिधी /पणजी
राज्यातील विविध बँकांमध्ये ठेवींच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. सप्टेंबर पर्यंत राज्यात 93618 कोटी रुपयांच्या ठेवी जमलेल्या होत्या. या उलट केवळ 30609.13 कोटी रु. ची कर्जे देण्यात आलेली आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचे आर्थिक सर्वेक्षण अहवाल गोवा राज्य विधानसभेत सादर केले. सदर अहवालात राज्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढल्याचे म्हटले आहे. सध्या ते रु. 5 लाख 4430 एवढे आहे. राज्य सरकारच्या उत्पन्नात 2021-22 या आर्थिक वर्षी रु. 14787.50 कोटी येऊन पडले. 5846.51 कोटी. रु. चा अतिरिक्त महसूल प्राप्त झाल्याचे सरकारने म्हटले आहे. महसूल वाढीच्या तुलनेत महसुली खर्चात वाढ होत आहे. गतवर्षी रु. 14729.03 कोटी खर्च आला ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत 15.19 टक्के एवढी होती.
कृषी क्षेत्रात समाधानकारक प्रगती झाल्याचे सदर अहवालात म्हटलेले आहे. 5506 कोटी रु. चे कृषी उत्पादन वाढल्याचे म्हटले आहे. तत्पूर्वी हे उत्पन्न रु. 4960 कोटीपर्यंत होते.
राज्यातील उद्योग क्षेत्रात प्रगती होत आहे. गोवा सरकारने गुंतवणूक महामंडळ स्थापन करून त्याद्वारे आतापर्यंत 219 प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यातून 16074.80 कोटी रु. ची गुंतवणूक होईल आणि 39241 जणांना त्यामुळे रोजगार संधी प्राप्त होईल.
राज्याच्या थेट करात नाममात्र 3 टक्के नी वाढ झाली. गतवर्षी 5472.51 कोटी रु. चा थेट करातून महसूल प्राप्त झाला तर केंद्राकडून मिळणाऱया कराच्या वाटय़ात कपात झाली. 2020-21 मध्ये केंद्राकडून 2750 कोटी रु. प्राप्त झाले होते तर 2021-22 मध्ये 2569.07 कोटी रु. चा महसूल प्राप्त झाला. राज्याच्या थेट महसुली करामध्ये 1.61 एवढी नाममात्र वाढ झालेली आहे. तर केंद्रीय कराच्या वाटय़ातून गोव्याला येणाऱया महसुलात 6.59 टक्के कपात झाली आहे.
राज्याच्या कराविरहित महसुलात चांगली वाढ झाली आहे. 2020-21 च्या तुलनेत 42.37 टक्के करविरहित महसुलात वाढ झाली आहे. 2021-22 मध्ये राज्याला 3209.16 कोटींचा करविरहित महसुल प्राप्त झाला. केंद्राकडून राज्यात विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी जे अनुदान मिळते त्यात गतवर्षी 37.73 टक्के नी वृद्धी झाली.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी महसुलात वाढ झाली आहे. गतवर्षी 4691.56 कोटी रु. चा महसूल व्यवसायिक कर खात्याने प्राप्त केला तर यावर्षी तो 5470.18 कोटी रु. वर जाऊन पोहोचला. वाहतूक खात्याच्या महसुलात गतवर्षी 233.32 कोटीवरून 2021-22 मध्ये रु. 252.38 कोटीपर्यंतची भर पडली.
राज्यातील बँका ठेवींनी फुगलेल्या आहेत. सध्या रु. 93618 कोटीच्या ठेवी सार्वजनिक बँकांमध्ये आहेत. गतवर्षीच्या तुलनेत 9.83 टक्के ठेवींच्या प्रमाणात वाढ झाली. तर गेल्या संपूर्ण दशकाचा आढावा घेता गोव्यात ठेवींमध्ये 174 टक्के नी वाढ झाली आहे.