जनार्दन भंडारी यांचे मुख्य सचिवांना निवेदन
प्रतिनिधी /काणकोण
मडगाव-कारवार मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात मालाची वाहतूक करणारी, अतिवेगाने जाणारी मालवाहू वाहने आणि अन्य व्यावसायिक वाहनांपासून होणाऱया समस्यांकडे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी लक्ष वेधले असून त्यांनी मुख्य सचिवांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
या मार्गावर दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढत असून ज्या ठिकाणी अरूंद रस्ते आहेत त्या ठिकाणी रस्त्याचे रूंदीकरण करण्याची आणि रस्त्याची डागडुजी करण्याची गरज भंडारी यांनी व्यक्त केली आहे. या मार्गावरून जी मालवाहू वाहने वाहतूक करतात त्यांची क्षमता तपासण्यासाठी चेकनाक्यावर वजनकाटा ठेवण्यात यावा, ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते त्या ठिकाणी कर्मचाऱयांची नियुक्ती करावी आणि कुंकळ्ळी ते काणकोणपर्यंतच्या रस्त्याच्या समस्यांचे निराकरण करताना या मार्गावरील खनिज वाहतूक बंद करण्यात यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.