वृत्तसंस्था/ बेंगळूर
प्रो कबड्डी लीगमध्ये रविवारी झालेला दबंग दिल्ली व गुजरात जायंट्स यांच्यातील पहिला रोमांचक सामना 24-24 असा टाय झाला तर दुसऱया सामन्यात बेंगळूर बुल्सने बंगाल वॉरियर्सवर केवळ एका गुणाने थरारक विजय मिळविला. बंगालच्या मनिंदरने 17 गुण मिळविले. मात्र पवन सेहरावतचे 15 गुण बेंगळूरसाठी निर्णायक ठरले.
शेवटच्या क्षणाला बंगालचा अनुभवी डिफेंडर रविंदर पहलने केलेल्या चुकीचा फायदा घेत नवीन कुमारने चढाईचा गुण मिळविला आणि दबंग दिल्लीने 24-24 अशी बरोबरी साधली. दिल्लीचा स्टार रायडर पुन्हा एकदा सुपर 10 (11 गुण) गुण मिळविले. या मोसमातील त्याचे हे तीन सामन्यातील तिसरे सुपर 10 आहे. मात्र दिल्लीला सुदैवानेच पराभव टाळण्यात यश आले. या सामन्यात बचाव फळीकडून अनेक चुका झाल्याचे दिसून आले. राकेश संरोग्य व राकेश नरवाल यांनी गुजरातला विजयाची संधी निर्माण करून दिली होती. पण त्यांना ती साधता आली नाही. चुरशीच्या पूर्वार्धात गुजरातचे लक्ष बचावावर केंद्रित झाले होते. पण रायडर्सनी त्यांना सर्वाधिक गुण मिळवून दिले.
राकेश नरवाल व राकेश एस. यांनी दिल्लीच्या बचावफळीवर दडपण आणत सहज गुण प्राप्त केले. मात्र दिल्लीच्या नवीन कुमारने गुजरातला आघाडी मिळणार नाही, याची दक्षता घेत पहिल्या तीन रेडमध्ये 3 गुण मिळविताना गिरीश एर्नाक व रविंदर पहल यांना बाद केले. पहिल्या 15 मिनिटात फक्त एक यशस्वी टॅकल पहावयास मिळाले. दोन्ही संघांनी एकेक टॅकल केले. पण कोणालाही ऑलआऊट करता आले नाही. मध्यंतराला दबंग दिल्लीने 12-11 अशी किंचीत आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात नवीन कुमारच्या आक्रमणाला गुजरातकडे प्रत्युत्तर नव्हते. पण मनजीत चिल्लर व जीवा कुमार यांच्या ठिसूळ टॅकलमुळे गुजरातला गुण मिळत गेले. या सत्रातील पाचव्या मिनिटाला नवीन कुमारने सुपर 10 साधले. सामना संपण्यास दहा मिनिटे असताना गुजरातच्या बचावफळीने नवीन कुमारला बाद करण्यात यश मिळविले. राकेश एस. व राकेश नरवाल यांनी अप्रतिम रेड्स टाकल्याने गुजरातने दिल्लीच्या जवळ मजल मारली. पण विजयने टच पॉईंट मिळवित नवीन कुमारला मैदानात आणले आणि नंतर आक्रमण करीत 14 व्या मिनिटाला दिल्लीला अल्पशी आघाडीही मिळवून दिली. राकेशच्या शेवटच्या रेडमध्ये एका प्रभावी किकने गुजरातला एका गुणाची आघाडी मिळवून दिली. पण रविंदर पहलने रेड टाकलेल्या नवीन कुमारची मांडी पकडण्याची घाई केली आणि दिल्लीला सामना टाय करून पराभव टाळण्यात यश आले.
बेंगळूर बुल्सची बंगालवर मात
अखेरच्या क्षणांत हुशारीने बदली खेळाडू उतरवण्याच्या केलेल्या चालीमुळे बेंगळूर बुल्सने बंगाल वॉरियर्सचा 36-35 असा निसटता पराभव केला. पवन सेहरावतने 15 गुण मिळविले तर मनिंदर सिंगने बंगालतर्फे 17 गुण मिळविले. मनिंदरने बंगालला सुरुवातीलाच गुण मिळवित 5-3 अशी आघाडी मिळवून दिली. चार डिफेंडर्स बाद झाल्यानंतर त्यांनी मनिंदरला पकडण्याचा प्रयत्न केला. मनिंदरने त्यांना हुलकावणी देत चारही खेळाडूंना बाद करून सहा गुणांचा सुपर रेड साधत बंगालला 11-3 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. पवन सेहरावतने नंतर जोरदार प्रत्युत्तर देताना दोन डिफेंडर्सना बाहेर केले आणि तिघांना बाद करीत 7 गुणांचा सुपर रेड साधत बंगालची आघाडी एका गुणावर आणली व नंतर बेंगळूरने मध्यंतराला एका गुणाची आघाडीही घेतली.
दुसऱया सत्रातील पहिली पाच मिनिटे दोघांचा तोडीस तोड खेळ झाला. बेंगळूरने काही गुण मिळवित बंगालचे तीन खेळाडू मॅटवर ठेवले. नंतर त्यांना सेहरावतने बाद करीत बंगालला ऑलआऊट करून आघाडी घेतली. बंगालनेही नंतर जोरदार प्रत्युत्तर देताना काही मिनिटांतच बेंगळूरला ऑलआऊट करून त्यांची आघाडी एका गुणावर आणली. मनिंदरने रेडमध्ये दोन गुण घेत बंगालला पुन्हा आघाडीवर नेले. एक मिनिट बाकी असताना बेंगळूरचे प्रशिक्षक रणधिर सेहरावत यांनी धाडसी चाल करीत कोरियाच्या डाँग जेऑनला मैदानात उतरवले आणि ही चाल मास्टरस्ट्रोक ठरली. डाँगने दोन गुण मिळवित बेंगळूरला आघाडी मिळवून दिली व नंतर एक गुणही बंगालला बहाल केला. मात्र सेहरावतने शेवटच्या चढाईत गुण मिळवित बेंगळूरला विजय मिळवून दिला.
आजचे सामने
1) पुणेरी पलटन वि. पाटणा पायरेट्स
वेळ ः रात्री 7.30 वा.
2) तेलुगू टायटन्स वि. हरियाणा स्टीलर्स
वेळ ः रात्री 8.30 वा.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.