राजकुमार राव अन् भूमी पेडणेकरचा चित्रपट
राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. तसेच निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. तर भूमीने पोस्टर शेअर करत ‘अरे यार अब तो यह सीक्रेट कल आउट हो जाएगा’ असे म्हटले आहे.
बधाई दोन हा एक कौटुंबिक विनोदी धाटणीचा चित्रपट आहे. चित्रपटात राजकुमार राव दिल्ली पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर भूमी पेडणेकर पीटी शिक्षिकेच्या व्यक्तिरेखेत असणार आहे. या चित्रपटामधील भूमिका माझ्यासाठी अत्यंत खास असल्याचे भूमी म्हणाली. बधाई हो चित्रपट अत्यंत आवडला होता, याचमुळे त्याच्या सीक्वेलमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे राजकुमारने म्हटले आहे.
भूमी आणि राजकुमार यांची जोडी पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर दिसून येणार आहे. यापूर्वी बधाई हो चित्रपटात आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्रा यांनी भूमिका साकारल्या होत्या. बधाई दो हा चित्रपट 4 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.