प्राचीन मंदिरात ग्रामस्थांनी अनुभवला प्रथमच किरणोत्सव
प्रतिनिधी / रत्नागिरी
शहरापासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या बसणी येथील पंचतत्व देवस्थान श्री महालक्ष्मी मंदिरात शनिवारी नैसर्गिक चमत्कार तेथील ग्रामस्थांनी प्रथमच अनुभवला. श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला सकाळच्या सोनेरी किरणांनी सूर्यस्नान झाले. या किरणांनी सकाळी 8 वाजून 5 व्या मिनिटांनी देवीच्या मूर्तीवर येत, तिला अभिषेक घातल्याची ही घटना ‘याची देही, याची डोळा’ अनुभवली.
नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात मावळतीला अंबाबाईच्या मूर्तीस सूर्यस्नान होते. हा प्रसिध्द किरणोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. पण रत्नागिरीतील बसणी गावात असलेल्या प्राचीन मंदिर श्री देवी महालक्ष्मीच्या ठिकाणीही मूर्तीवर किरणोत्सव होतो. याची आजपर्यंत तेथील ग्रामस्थांनीही कल्पना नव्हती. उगवतीचा सूर्य जेव्हा मंदिराच्या द्वारासमोर येतो. तेव्हा सकाळची सोनेरी किरणे या देवीच्या मंदिरात प्रवेश करतात. पण या प्रत्यक्ष किरणोत्सवाची अनुभूती कुणी ग्रामस्थांनी घेतलेली नव्हती.