प्रतिनिधी /बेळगाव
बसवाण गल्ली तसेच देशपांडे गल्ली परिसरात डेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी डेनेज वाहिन्या घालून ड्रेनेज जोडणीचे कामही पूर्णत्वास आले आहे. बसवाण गल्लीत व देशपांडे गल्ली रस्त्यावर साचलेले मातीचे ढिगारे हटवून रस्ता व्यवस्थित करण्याची मागणी होत आहे.
बाजारपेठेत विविध ठिकाणी डेनेज तुंबण्याची समस्या निर्माण होत आहे. देशपांडे गल्ली आणि बसवाण गल्ली परिसरात ही समस्या मागील दोन वर्षांपासून भेडसावत होती. डेनेज वाहिन्या बदलण्यासाठी व दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने 75 लाखाच्या निविदा काढल्या होत्या. याअंतर्गत दोन्ही गल्ल्यातील डेनेजवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. देशपांडे गल्ली आणि बसवाण गल्ली परिसरातील डेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू होऊन महिना झाला. अद्यापही हे काम सुरूच आहे. बसवाण गल्ली परिसरातील डेनेजवाहिन्या घालण्यासह चेंबरचे बांधकाम आणि घरोघरी डेनेज जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या ठिकाणी असलेला रस्ता अद्याप दुरुस्त करण्यात आला नाही. या परिसरात लक्ष्मी मंदिर असून, भाविकांची नेहमी गर्दी असते. तसेच बाजारपेठेत ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. त्यामुळे या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वर्दळ आहे.
येथील रस्ता वाहनधारकांना आणि व्यावसायिकांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, तसेच ड्रेनेजवाहिन्या घालण्यात आलेल्या रस्त्यावर असलेले मातीचे ढिगारे हटविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.