क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
प्रथमश्रेणी क्रिकेटमधील उत्तम अनुभव असणारे रोहन कदम व रोनित मोरे, असे बेळगावचे 2 खेळाडू देखील नोंदणीकृत 590 खेळाडूंमध्ये समाविष्ट आहेत. यापैकी रोनित मोरेने 2 वेळा आयपीएल प्रतिनिधीत्व केले असून दोन्ही वेळा तो चेन्नई सुपरकिंग्स संघातून खेळला आहे.
रोनित मोरे
रोनित मोरे याने जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून मद्रास येथे एमआरएफ पेस फौंडेशन या गोलंदाजीच्या प्रशिक्षण सेंटरमध्ये निवड होऊन त्याने ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वर्षे प्रशिक्षण घेतले. कर्नाटक व हिमाचल या दोन राज्यातून सातत्याने रणजी संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2018-19 रणजीमध्ये 37 बळी घेऊन सर्वोत्तम गोलंदाज ठरला होता. त्यामुळे रेस्ट ऑफ इंडिया व इंडिया रेड चॅलेंजर चषकासाठी त्याची निवड झाली होती. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग संघाकडून दोनवेळा त्याची निवड झाली होती. रोनित मोरेने बेळगाव स्पोर्ट्स क्लब अकादमीमध्ये आपले क्रिकेटचे धडे गिरवले आहेत.
रोहन कदम
19 व 23 वर्षाखालील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये त्याची निवड झाली होती. सय्यद मुस्ताकअली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत त्याने सर्वाधिक 567 धावा केल्या होत्या. उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कर्नाटक संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. रोहन सध्या टी-20 व एकदिवशीय सामन्याचे कर्नाटक संघाकडून प्रतिनिधीत्व करीत आहे. केपीएल स्पर्धेत बळ्ळारी टस्कर संघाकडून खेळताना संघाला विजय मिळवून देण्यात रोहनचा सिंहाचा वाटा होता. रोहन कदमने बेळगाव स्पोर्ट्स क्लबमधून आपले क्रिकेटचे धडे गिरविले असून, या दोघांना धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेचे समन्वयक अविनाश पोतदार यांचे प्रोत्साहन लाभले आहे.