परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांची माहिती
प्रतिनिधी /अथणी
कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगाने पसरली. परिणामी रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाल्याने लॉकडाऊन जारी करण्यात आला. त्यामुळे परिवहन मंडळाला मोठा फटका बसून उत्पन्नात मोठी घट झाली आहे. आता डिझेलच्या दरात वाढ झाली असतानाही बस तिकीट दरात वाढ करणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली. शहरातील बसस्थानकाच्या पुनर्निर्माण कामांचे भूमिपूजन करून ते बोलत होते.
सवदी पुढे म्हणाले, आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे परिवहनकडून तिकीट दरवाढ करून नागरिकांना आणखी महागाईच्या खाईत टाकणार नाही. सध्यातरी तिकीट दरात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. अथणी शहरात सिटी बससेवा सुरू करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचेही सांगितले. यावेळी हुबळी कार्यालयातील अभियंते के. बी. कुलकर्णी, परिवहन मंडळाचे अध्यक्ष व्ही. एस. पाटील, आरएसएस उत्तर विभागाचे सहसंचालक अरविंदराव देशपांडे यांच्यासह मान्यवर व परिवहन कर्मचारी उपस्थित होते.