मेहर अन् कुटुंबाचा खर्च वाढल्याने कमांडरांकडून भ्रष्टाचार
स्वतःच्या अत्यंत मुलतत्ववादी तसेच जुनाट प्रथांसाठी ओळखले जाणारे तालिबानच बहुविवाहामुळे त्रस्त झाले आहे. धर्मानुसार अफगाणिस्तानात बहुविवाह कायदा असल्याने तेथे तालिबानी कमांडर आणि नेते एकाहून अधिक विवाह करतात. कुटुंबाचा आकार मोठा असल्याने त्यांचा खर्चही वाढला आहे. याचमुळे तालिबानी कमांडर भ्रष्टाचार तसेच संघटनेसाठी अवैध मानली जाणारे कृत्येही करत आहेत. यासंबंधी मोठय़ा प्रमाणावर तालिबानच्या कमांडरांच्या विरोधात तक्रारी प्राप्त होत आहेत. याच वाढत्या समस्येने त्रस्त तालिबानच्या नेतृत्वाने अधिक विवाह टाळण्याचा एक फर्मानच काढला आहे.
पूर्वलक्ष्यी प्रभाव नाही
नेते आणि कमांडरांनी अनेक पत्नी बाळगणे टाळावे. एकापेक्षा अधिक पत्नींमुळे विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. बहुतांश तालिबानी नेते आणि कमांडरांना एकापेक्षा अधिक पत्नी आहेत. परंतु यापूर्वीच अनेक विवाह झालेल्यांवर हा निर्देश लागू होणार नसल्याचे तालिबानच्या या फर्मानात म्हटले गेले आहे.
अफगाण, पाकिस्तानात अधिक प्रमाण
कमांडरांमध्ये मेहरची रक्कम म्हणजेच वधूऐवजी दिल्या जाणाऱया रकमेची मागणी वेगाने वाढली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात अनेक पश्तून आदिवासींमध्ये वरपक्षाला विवाहासाठी मुलीच्या कुटुंबांना मोठी रक्कम द्यावी लागते.
दोन पानी फर्मान
तालिबान नेता मुल्लाह हिबतुल्लाह याच्या नावाने हा दोन पानी फर्मान काढण्यात आला आहे. 2 किंवा 4 विवाहांवर बंदी नाही, परंतु विवाहांमध्ये मोठा खर्च होत असल्याने तो टाळला जावा. सर्व कमांडरांनी बहुविवाह टाळल्यास त्यांना भ्रष्टाचार आणि अवैध कारवायांमध्ये सामील व्हावे लागणार नसल्याचे तालिबानकडून म्हटले गेले आहे.
काही जणांना मात्र सूट
फर्मानात काही लोकांना बहुविवाहाची सूट देण्यात आली आहे. अपत्य नसलेले किंवा मुलगा नसलेले किंवा विधवेशी विवाह करू इच्छिणाऱयांना एकापेक्षा अधिक विवाह करण्याची मुभा असणार आहे. तसेच विवाहाचा खर्च पेलू शकरणाऱया कुटुंबाला हा फर्मा लागू नसेल. बहुविवाह करण्यापूर्वी संबंधिताला वरिष्ठाची अनुमती घ्यावी लागणार असल्याचे फर्मानात बजावण्यात आले आहे.