मोटर्सकडून ट्विट -अनेक कयास व्यक्त
टाटा मोटर्स इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या ट्विटर खात्यावरून अलिकडेच एक ट्विट करण्यात आला, या ट्विटने पूर्ण वाहननिर्मिती क्षेत्रात खळबळ उडविली आहे. प्रत्येक जण याच ट्विटसंबंधी बोलत आहे. परंतु कंपनीने आता हा ट्विट हटविला असला तरीही कयास व्यक्त होणे सुरूच आहे. टाटा मोटर्सच्या ट्विटमध्ये टेस्ला आणि त्याचा मालक एलन मस्क यांच्या उल्लेखासह एका जुन्या चित्रपटाच्या गाण्याच्या काही पंक्ती लिहिण्यात आल्या होत्या. या ट्विटनंतर टाटा आणि टेस्ला एकत्र येणार असल्याचे बोलले गेले.
टाटा मोटर्स इलेक्ट्रिक मोबिलिटीने ट्विटमध्ये 1960 च्या दशकातील एका बॉलिवूड गाण्याच्या ओळी लिहिल्या होत्या. या गाण्यात शम्मी कपूर आणि मुमताज यांनी अभिनय केला होता. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर अखबार में, सब को मालूम है और सबको खबर हो गई’ असे ट्विटमध्ये नमूद होते. ट्विटमध्ये टेस्ला मस्क यांचा हॅशटॅग वेलकम टेस्ला हॅशटॅग टेस्ला इंडियाही म्हटले गेले होते.
हा ट्विट आता हटविण्यात आला असून कंपनीच्या प्रवक्त्याने टेस्लासोबत अद्याप कुठल्याही प्रकारची भागीदारी नसल्याचे सांगितले आहे. परंतु टेस्लाच्या भारतातील आगमनानंतर एका ट्विटमुळे लोक अनेक प्रकारचे अंदाज व्यक्त करत आहेत.
समभाग वधारण्याचे कारण
काही दिवसांपूर्वी टाटा मोटर्सच्या समभागांमध्ये तेजी दिसून आली होती. मागील सुमारे 3 महिन्यांमध्ये कंपनीच्या समभागांचे मूल्य जवळपास दुप्पट झाले आहेत. टाटा मोटर्स आणि टेस्ला यांच्यात भागीदारी होणार असल्याच्या चर्चेने समभाग वधारल्याचे मानले जात आहे.