वृत्तसंस्था/ ढाक्का
कोरोना महामारी संकटामुळे बंगलादेशमधील सर्व क्रिकेट हालचाली गेल्या जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्णपणे थांबविण्यात आल्या होत्या पण आता बांगलादेशच्या नऊ क्रिकेटपटूंनी चार विविध केंद्रामध्ये रविवारी आपल्या वैयक्तिक क्रिकेट प्रशिक्षण सरावाला फेर सुरूवात केली असल्याची माहिती बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली.
बांगलादेशच्या क्रिकेटपटूंना 19 जुलैपासून वैयक्तिक प्रशिक्षण सराव करण्यास बांगलादेश क्रिकेट मंडळाने परवानगी दिली आहे. हे सराव शिबीर विविध सत्रामध्ये घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. ढाक्यातील शेर ए बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियम, चितगावमधील झेऊर अहमद चौधरी स्टेडियम, सिलेतमधील सिलेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि खुलना येथील शेख अबु नासेर स्टेडियममध्ये बांगलादेशच्या नऊ क्रिकेटपटूंना सराव करण्यास परवानगी दिली आहे.
क्रिकेट सरावाच्या पहिल्या टप्यामध्ये मुशफिकुर रहीम, इमरूल कायेस, मोहम्मद मिथुन, शफीउल इस्लाम, सैय्यद खलीद अहमद, नासुम अहमद, नुरूल हसन, मेहदी हसन आणि नईम हसन या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. कोरोना महामारीमुळे बांगलादेश संघाचा श्रीलंका दौरा लांबणीवर टाकण्यात आला आहे तसेच न्यूझीलंडचा बांगलादेश दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.