वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेश क्रिकेट संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी जॉन लेविस यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाने केली आहे. बांगलादेशचा संघ आगामी विंडीज आणि न्यूझीलंडविरूद्ध द्विदेशीय मालिका खेळणार असून या मालिकेवेळी बांगलादेश संघाचे फलंदाज प्रशिक्षक म्हणून जॉन लेविस कार्यरत राहतील.
यापूर्वी बांगलादेश संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदाची जबाबदारी नील मॅकेंझी यांच्यावर सोपविण्यात आली होती. आता मॅकेंझींच्या जागी लेविस यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती बांगलादेश क्रिकेट मंडळाचे चेअरमन अक्रम खान यांनी दिली. मॅकेंझी यांनी गेल्या ऑगस्टमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. जॉन लेविस यांची 2018 च्या डिसेंबरमध्ये लंकन संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. 2013 ते 2016 या कालावधीत इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत डरहॅम संघाचे ते प्रमुख प्रशिक्षक होते. त्यांच्या कारकीर्दीत डरहॅम संघाने तीनवेळा विजेतेपद मिळविले होते. जवळपास दोन दशकांच्या क्रिकेटच्या कारकीर्दीमध्ये लेविस यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 16 शतके झळकविली आहेत. न्यूझीलंडचा माजी कर्णधार तसेच बांगलादेश संघाचे विद्यमान गोलंदाज प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी विंडीजविरूद्धच्या आगामी मालिकेवेळी उपलब्ध होवू शकणार नाहीत, पण त्यानंतर न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेवेळी ते उपलब्ध राहणार आहेत. 20 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान बांगलादेश आणि विंडीज यांच्यात तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. त्याचप्रमाणे बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने आयोजित केले असून बांगलादेशचा संघ 23 फेब्रुवारीला न्यूझीलंडला रवाना होणार आहे.