‘तरुण भारत’च्या ‘सर्च लाईट’ची दखल : 15 रोजी अंमलबजावणी बाबतची सुकळवाड येथे मुहूर्तमेढ बैठक : जिल्हय़ातील तरुणांना देणार प्रशिक्षण : बांधकाम क्षेत्रात प्रशिक्षित कामगारांची वानवा
प्रतिनिधी / ओरोस:
परजिल्हय़ातील प्रशिक्षित बांधकाम कामगार परत गेल्याने बांधकाम क्षेत्रातील प्रशिक्षित कामगारांची उणीव भरून काढण्यासाठी जिल्हय़ातील तरुणांना प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याच्या ‘तरुण भारत’ने दिलेल्या हाकेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. अप्रशिक्षित बांधकाम कामगारांना प्रशिक्षित करण्यासाठी सुकळवाड येथील मेट्रोपॉलिटन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍन्ड मॅनेजमेन्ट कॉलेज सह बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱया जिल्हय़ातील अनेकांनी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. येथील कामगारांना प्रशिक्षण देण्याबाबतचे धोरण आणि त्याची अंमलबजावणी याबाबतची मुहूर्तमेढ 15 जुलै रोजी एम.आय.टी.एम. कॉलेज सुकळवाड येथे रोवली जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात बाहेरून दाखल झालेला प्रशिक्षित बांधकाम कामगार त्याच्या मूळ गावी स्थलांतरीत झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील बांधकाम व्यवसाय अडचणीत आला असून यावर मात करण्यासाठी आता जिल्हय़ातील तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे वास्तव ‘गरुडावर बैसोनि माझा कैवारी आला’ या सदराखाली ‘तरुण भारत’मधून प्रसिद्ध करण्यात आले होते.
झूम ऍपद्वारे झाली बैठक
सुकळवाड येथील एम.आय.टी.एम. कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी याबाबतची संबंधित क्षेत्रातील व्यक्तींची मते जाणून घेण्यासाठी नुकतीच झूम ऍपवरून एक बैठक आयोजित केली होती. यामध्ये सावंतवाडी येथील बांधकाम अभ्यासक डॉ. दिनेश नागवेकर, सिव्हील इंजिनिअर लक्ष्मीकांत खोबरेकर, कौशल्य विकास सहआयुक्त सुनील पवार, क्रेडाईचे गजानन कांदळगावकर व अन्य, प्राचार्य सूर्यकांत नवले, एम.आय.टी.एम. हेड ऑफ दी डिपार्टमेंट मयुरी दिवाण, प्रसाद सावंत, अल्ट्राटेक सिमेंटचे रुपेश पन्हाळकर, सिव्हील इंजिनिअर प्रसाद दळवी, क्रेडाई मेंबर्स, विकासक, बिल्डर्स, सिव्हील कॉन्ट्रक्टर, सिव्हील इंजिनिअरिंग फर्म, यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक सावंतवाडी, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवण आदींनी सहभाग घेतला होता.
प्रशिक्षित कामगार कमतरतेमुळे प्रशिक्षणाची गरज
बांधकाम अभ्यासक डॉ. दिनेश नागवेकर यांनी प्रशिक्षित कामगारांच्या स्थलांतरामुळे गवंडी, सुतार, प्लंबर्स, रंगारी, सिव्हील मशिनरी ऑपरेटर्स यांची कमतरता भासू लागली असल्याचे मान्य केले. यावर मात करण्यासाठी जिल्हय़ातील तरुण बांधकाम कामगारांना प्रशिक्षित करण्याची गरजही व्यक्त केली.
प्रशिक्षित कामगारांना सामावून घेण्याचे आवाहन
कौशल्य विकास सह आयुक्त सुनील पवार यांनी क्रेडाई बांधकाम व्यावसायिक, सिव्हील कॉन्ट्रक्टर यांच्याकडून सूचविण्यात आलेल्या वा शिफारस करण्यात आलेल्या भागांमधील तरुणांना कौशल्य विकास संस्थांच्या माध्यमातून शासकीय योजनांचे प्रशिक्षण देण्याची तयारी दाखविली. अशा प्रकारे ट्रेनिंग देण्यात आलेल्या कामगारांना व्यवसायात सामावून घेण्याची विनंतीही त्यानी क्रेडाई मेंम्बर्सना केली.
कामगारांच्या कार्यक्षमतेवर नाराजी
लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी स्थानिक कामगारांच्या कार्यक्षमतेवर हल्ला चढवला. स्थनिक कामगार ठरवून दिलेल्या वेळेत नेमून दिलेले टार्गेट वा काम पूर्ण करीत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यांचा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा गंभीर नाही. ते आपल्या सोयीनुसार कामाकडे पाहतात. अनेक छोटय़ा मोठय़ा कारणांसाठी रजा घेण्याची प्रवृत्ती मोठी आहे. त्यामुळे कामाच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम होतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे व्यावसायिक प्रशिक्षित असलेल्या आणि कोणत्याही सुट्टीशिवाय सतत कामात व्यस्त राहणाऱया, काम वेळेत पूर्ण करणाऱया या इतर जिल्हय़ातील कामगारांना पसंती देतात. यापुढे शासनाच्या विविध कौशल्य विकास योजनांचे प्रशिक्षण घेतलेल्या वा घेणाऱया जिल्हय़ातील कामगारांनाच कामगार विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
एम.आय.टी.एम.मार्फत देणार कौशल्य विकास प्रशिक्षण
एम.आय.टी.एम. कॉलेज प्राचार्य सूर्यकांत नवले यांनीही त्यांच्या कॉलेजमार्फत शासनाच्या विविध योजनांचे प्रशिक्षण देण्याची तयारी दाखविली. पंतप्रधान कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान त्याचप्रमाणे जिल्हय़ातील क्रेडाई मेंबर्स आणि सिव्हील कॉन्ट्रक्टर यांच्या मागणीनुसार बांधकाम व्यवसायाला आवश्यक असणारे विविध ट्रेनिंग प्रोग्राम राबविण्याची तयारीही या कॉलेजच्या प्राचार्यांनी दाखविली.
कामगारांनी प्रशिक्षणाबाबतची मानसिकता बदलण्याचे आवाहन
अल्ट्राटेक सिमेंटचे रुपेश पन्हाळकर यांनी त्यांनी यापूर्वी जिल्हय़ातील कामगारांना दिलेल्या प्रशिक्षणादरम्यानचे आपले अनुभव कथन केले. येथील कामगार या प्रशिक्षणाचा कंटाळा करतात आणि पूर्ण दिवस बसण्याचेही टाळतात. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रातील वर्कर्सना आपल्या कंपनीतर्फे छोटय़ा कालावधीचे ट्रेनिंग देण्याची तयारी दर्शविली.
प्रशिक्षणाशिवाय योजना लाभ न देण्याच्या विचारात परीवर्तनाची आवश्यकता
बांधकाम कामगारांसाठी सरकारने जाहीर केलेल्या योजना या कामगार कार्यालयामार्फत राबविल्या जातात. त्यामुळे ट्रेनिंग घेतल्याशिवाय या योजनांचा लाभ न देण्याबाबत बंधन आणणे शक्य होणे कठीण असल्याचे मत ‘तरुण भारत’ चे आवृत्ती प्रमुख विजय शेट्टी यांनी व्यक्त केले.
प्रशिक्षण संस्था उभारण्याची गरज
सिव्हील इंजिनिअर व ट्रेनर प्रसाद दळवी यांनी जिल्हय़ातील तरुणांना प्रशिक्षण देणारी एखादी संस्था स्थापन करण्याची गरज व्यक्त केली. बेंगलोर बेसड लेबरनेट सारख्या बाहेरच्या संस्थांकडून कामगार भाडय़ाने घेण्यापेक्षा येथे संस्था सुरू झाल्यास स्कील्ड वर्कर्स येथेच उपलब्ध होणार आहेत. बेंगलोर येथील संस्था अनेक कामगारांना प्रशिक्षण देत आहे. त्याच धर्तीवर आपण एखादी संस्था सुरू करू, असा सल्ला दिला.
15 जुलै रोजी अंमलबजावणी विचार विविमय बैठक दरम्यान, 15 जुलै या जागतिक कामगार कौशल्य दिनी जिल्हय़ातील कैशल्य विकास विभाग, कामगार विभाग, क्रेडाई मेंबर्स, सिव्हील इंजिनिअर्स आणि प्रशिक्षण देणाऱया संस्था यातील काही विशेष निमंत्रितांची सोशल डिस्टंसिंगची पूर्ण खबरादारी घेऊन बैठक आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हय़ातील तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठीच्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य नवले यांनी दिले.