बांधकाम साहित्यासह व रोख रकमेची चोरी
प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्यातील गेजेगाव व शेंद्रे येथे कंपनीच्या बांधकाम साईटवरील बांधकाम साहित्य व कामगारांचे वेतन असा एकूण 15 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप याप्रकरणी कोणास अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार रघुनाथ हेमंत दुबे (वय 24, रा. पिरवाडी, सातारा, मूळ रा. फरिदापूर, मध्यप्रदेश) एका कंपनीत कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीतच कामाला असलेल्या वैभव बर्गे (रा. चिंचणेर, ता. सातारा) व संदीप पावसकर (रा. गोल्डन होम अपार्टमेंट, कारवार रोड, हुबळी) या दोघांनी दि. 2 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीत कंपनीतील 7 लाख 50 हजार रुपये किंमतीचे लोखंडी पोल, 5 लाख रुपये किंमतीचे कन्डक्टर, फेब्रिकेशन व इतर साहित्य, 45 हजारांचे सिव्हिल मटेरियल, 33 हजार रुपयांच्या मशिनरी तसेच 1 लाख 8 हजार रुपये लेबर चार्ज व तक्रारदाराचा 85 हजार रुपये वेतन असे एकूण 15 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.
याबाबत दुबे यांनी दि. 18 रोजी दिलेल्या तक्रारीनंतर बर्गे व पावसकर यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण करत आहेत.