प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेची परवानगी न घेता बाउन्स वाहने भाडेतत्वावर देण्यासाठी शहरातील रस्त्याशेजारी पार्क करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेच्या महसूल विभागाने सदर वाहने जप्त करून मनपा कार्यालयात ठेवली आहेत. तीन महिने उलटले तरी अद्याप सदर वाहने सोडण्यात आली नाहीत. त्यामुळे दुचाकी वाहने मनपा कार्यालय आवारात पडून आहेत.
बाउन्स कंपनीने दुचाकी वाहने भाडेतत्त्वावर देण्याची सुविधा शहरात उपलब्ध केली आहे. ऑनलाइनद्वारा भाडे भरणा करून या वाहनांचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे शहरातील विविध रस्त्याशेजारी तसेच काही दुकानांसमोर दुचाकी वाहने पार्क करण्यात येत होती. पण शहरात कोणताही व्यवसाय करण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र बाउन्स कंपनीने महानगरपालिकेकडून कोणतीच परवानगी घेतली नाही. अशातच दुचाकी वाहने विविध रस्त्याशेजारी पार्क करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. ठीकठिकाणी करण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांना अडकून पडावे लागत होते. त्यामुळे याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन महानगरपालिकेच्या महसूल विभागाने दुचाकी वाहने जप्त करण्याची कारवाई केली होती. सदर वाहने महापालिका कार्यालयाच्या आवारात ठेवली आहेत. वाहने सोडवून घेण्यासाठी महानगरपालिकेकडे अर्ज केला आहे. पण याबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे ही वाहने महानगरपालिका कार्यालयाच्या आवारात धूळखात पडली आहेत.