प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-बागलकोट जिल्हय़ातील आणखी 14 जण कोरोनामुक्त झाले असून सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये निपाणी, संकेश्वर, रायबाग, बागलकोट येथील बाधितांचा समावेश आहे. आतापर्यंत 93 जण बरे झाले आहेत.
बिम्स् प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रुग्ण क्रमांक 816, 839, 822, 825, 826, 827, 829, 831, 819, 837, 840, 841, 843, 845 यांना घरी पाठविण्यात आले. घरी गेल्यानंतर आणखी 14 दिवस घरातच राहण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला आहे.
यामधील बहुतेक जण अजमेरहून परतलेले यात्रेकरु आहेत. निपाणी, संकेश्वर, चिकोडी, रायबाग, बदामी, बागलकोट येथून अजमेर दर्ग्याला जावून जिल्हय़ात परतलेल्या 38 पैकी 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यापैकी बहुतेक जण वेगवेगळय़ा सरकारी विश्रामधामावरील स्वयंपाकी आहेत.
बेळगाव जिल्हय़ातील 22 व बागलकोट जिल्हय़ातील 8 असे एकूण 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यामधील 14 जण बरे झाले आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. यामधील आणखी 16 जणांवर उपचार सुरू असून लवकरच त्यांचा अहवालही निगेटिव्ह आला तर त्यांनाही घरी पाठविण्यात येणार आहे.
आणखी 1009 अहवालांची प्रतीक्षा
बेळगाव शहर व जिल्हय़ातील आणखी 1009 जणांच्या अहवालांची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. जिल्हा सर्वेक्षण विभागाने सोमवारी रात्री दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 10 हजार 293 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. तर 2 हजार 319 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 8 हजार 996 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. यापैकी 7 हजार 708 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 122 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 36 जणांवर उपचार करण्यात येत आहेत.