वार्ताहर/ जमखंडी :
बागलकोट येथे 41 वर्षीय महिलेमुळे तिच्या कुटुंबातील तीन मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. सदर महिला 7 एप्रिल रोजी कोरोनाची पॉझिटिव्ह ठरली होती. तिला शेजारील महिलेमुळे लागण झाली होती. तिचा चार वर्षीय मुलगा तसेच दिराच्या 13 आणि 9 वर्षीय मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे जिल्हय़ात एकूण बाधितांची संख्या 8 झाली आहे. त्यापैकी एका वृद्धाचा आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. बागलकोट शहरातील वॉर्ड क्र. 7 व 14 या परिसरात आतापर्यंत 7 रुग्ण आढळून आले असून एक रुग्ण मुधोळ येथील आहे.
बागलकोटमधील 7 व 14 या वॉर्ड परिसरात संचारबंदी असून या भागातील नागरिकांना जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती विशेष अप्पर जिल्हाधिकारी बसवराज सोमण्णवर यांनी दिली. बागलकोट तालुकास्तरीय अधिकाऱयांच्या सभेत ते बोलत होते. तसेच त्यांना आवश्यक असेल त्याप्रमाणे वैद्यकीय सेवाही पुरविली जात आहे.
अधिकाऱयांनी शिस्तबद्ध सेवा द्यावी
अधिकाऱयांनी या संकटप्रसंगी प्रामाणिक व शिस्तबद्ध सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. निष्काळजीपणा करणाऱया अधिकाऱयांविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. संचारबंदी असलेल्या भागात 5000 जणांचा सर्व्हे करण्यात आला असून वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणाऱयांना पीपीई रक्षण कवच व एन-95 मास्कची मागणी तालुका वैद्याधिकारी डॉ. बी. बी. हुबळ्ळी यांनी केली. आतापर्यंत 1500 हातमोजे वापरण्यात आले असून रेडझोनमध्ये कार्य करणाऱया अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी हैड्राक्लोरोफेन व ऍन्टीन्यालरियल औषध सेवन करण्याची सूचना डॉक्टरांनी दिली.
परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन
या झोनमधील नागरिकांनी उघडय़ावर शौचास न जाता उपलब्ध सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा, परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन पालिका आयुक्त मुनिशामप्पा यांनी केले. बागलकोट येथील बसवेश्वर सर्कल व वल्लभभाई पटेल चौक येथे आरोग्य सेवा पुरविण्याकरिता छावण्या उभारण्यात आल्या असून सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत सेवा पुरविण्याची सोय असून संचारबंदी असलेल्या परिसरातील नागरिकांनी घरपोच वैद्यकीय सेवेकरिता 9449843186 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. हुबळ्ळी यांनी केले. संचारबंदी परिसरात रेशनची चार दुकाने असून 4 हजार कुटुंबे आहेत. त्यापैकी 350 कुटुंबांना घरपोच आहारधान्य पुरविण्यात आले असून अन्य कुटुंबांना दोन दिवसात पुरवठा करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.