पटांगणाला तलावाचे स्वरुप : वर्गात धूळ शिरून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका
वार्ताहर /उचगाव
बाची येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेसमोर शासनामार्फत पेव्हर्स बसविण्यासाठी खोदकाम करण्यात आलेले आहे. मातीचे ढिगारेही टाकण्यात आले आहेत. मात्र, अद्याप या कामाला सुरुवात न झाल्याने शाळेच्या पटांगणात पाण्याची डबकी साचून तलावाचे स्वरुप आल्याने पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शाळाखोल्या धुळीने माखल्या आहेत. याबाबत पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार शाळेच्या पटांगणात पेव्हर्स बसविण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. या कामाला प्रारंभ करण्यात आला. माती टाकण्यात आली, खडी टाकण्यात आली. मात्र, अद्याप पेव्हर्स बसविण्याच्या कामाला सुरुवात न झाल्याने या पटांगणात खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरुप निर्माण झाले आहे.
सदर पटांगणातील धूळ वर्गामध्ये शिरत असल्याने मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबरोबरच मध्यान्ह आहार योजनेंतर्गत दुपारी मुलांना जेवण दिले जाते. सदर मुले पटांगणातील व्हारांडय़ात बसून जेवण करत असतात. अशा वेळी सर्व धूळ या जेवण करणाऱया मुलांच्या ताटावरून उडत असते.
त्यामुळे मुलांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. पावसाचे पाणी सध्या पटांगणातील खड्डय़ांतून साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासाठी शासनाने तातडीने या पटांगणात पेव्हर्स बसवून या कामाची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी पालक वर्गातून करण्यात येत आहे.