निपाणी पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक सादर : राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनसाठी दीड कोटींची तरतूद
वार्ताहर /निपाणी
निपाणी शहराची बाजारपेठ परिसरातील ग्रामीण भागासह सीमाभागातील महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. वाढत्या व्यापारीकरणात हे महत्त्व टिकवून ठेवण्यासह उद्योग वाढविणे व त्यातून रोजगार निर्मिती व्हावी हे उद्देश डोळय़ासमोर ठेवून नगरपालिकेचे अंदाजपत्रक सभापती राजू गुंदेशा यांनी मंगळवारी सभागृहात मांडले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱया राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाचे कामही लवकरात लवकर पूर्णत्वाला आणण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. 36 कोटी 56 लाख 61 हजार 740 रुपयांच्या निधीतून 14 लाख 30 हजार 616 रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयवंत भाटले होते.
स्वागत व प्रास्ताविक आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी केले. व्यापार, उद्योग व रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यासाठी शहरात भाजी मार्केट, चाटे मार्केट, सिद्धोजीराजे मार्केट व गांधी चौक अशा चार ठिकाणी व्यापारी संकुले उभारण्यात येणार आहेत. यासाठी 3 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छतेला प्राधान्य देताना व निपाणी स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी घनकचरा निर्मूलन व एसडब्ल्यूएमकरिता पूर्वीची तरतूद 3 कोटी 42 लाख 50 हजार इतकी आहे. यामध्ये 97 लाख 75 हजाराची अधिकची तरतूद करण्यात आली आहे. नागरी सुविधा व पाणीपुरवठय़ासाठी 5 कोटी 61 लाख 31 हजारांची पूर्वीची तरतूद आहे. ही तरतूद देखील 67 लाख 75 हजारांनी वाढविताना पाणीपुरवठा सुरळीत करण्याला प्राधान्य दिले आहे.
मूलभूत सुविधा व विकासावर भर
शहरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथसाठी पेव्हरब्लॉक व रस्त्याच्या बाजूने गटार निर्माण करण्यासाठी यापूर्वी फक्त 25 लाख 25 हजाराची तरतूद होती. रस्ते, फुटपाथ व पाणी निचरा शहराच्या विकासाचे माध्यम आहेत. हे लक्षात घेऊन या तरतुदीमध्ये भरीव अशी 2 कोटी 26 लाखांची अधिकची भर घातली गेली आहे. पथदीप दुरुस्ती ही एक समस्या बनली आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी तरतूद असणारा 2 कोटी 15 लाख 65 हजाराचा निधी अपुरा आहे. हे लक्षात घेऊन 34 लाखांची अधिकची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृहांसाठी 15 लाखांची अधिकची तरतूद करण्यात आली आहे.
मागासवर्गीयांच्या विकासासाठी वाढीव निधी
सार्वजनिक उद्यानांचा विकास व्हावा ही बहुसंख्य नागरिकांची मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन 25 लाख 50 हजाराच्या असणाऱया तरतुदीमध्ये 10 लाखाची भर घातली आहे. स्मशानभूमी व कब्रस्थान कामाकरिता 10 लाख 50 हजार व शिवाजीनगर येथे छत्रपती शिवाजी स्मारक उभारण्यासाठी 25 लाख अशी नव्याने तरतूद करण्यात आली आहे. 24.10 टक्के निधी नगरपालिका फंडातून एससी, एसटी जनतेसाठी 2 लाख 20 हजार 207 इतकी तरतूद होती. यामध्ये 3 लाख 31 हजार 810 रुपयांची वाढीव तरतूद केली आहे. 24.10 टक्के निधी अनटाईड फंडातून एससी, एसटी जनतेसाठी 10 लाखाची तरतूद होती. ही तरतूददेखील 15 लाखाने अधिकची वाढविली आहे. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता असणारी 1 लाख 2 हजार 947 ची तरतूद व दहन-दफन विधी नगरपालिका कर्मचाऱयांचे असणारे अनुदान 60 हजार कायम ठेवले आहे.
म्युनिसिपल हायस्कूल इमारतीसाठी वाढीव 75 लाखाचा निधी
नगरपालिका फंडातून 7.5 टक्के आर्थिक व इतर मागासवर्गीयांच्या विकासासाठी असणाऱया 66 हजार 456 च्या तरतुदीतून 99 हजार 818 ची अधिकची तरतूद केली आहे. अंगविकलांग जनतेच्या विकासासाठी 5 टक्के निधीतून 45 हजार 894 रुपयांच्या तरतुदीत 68 हजार 840 रुपयांची भर घातली आहे. दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना टॅब वितरणासाठीची 1 लाख 50 हजाराची तरतूद कायम ठेवली आहे. वृक्ष लागवडीसाठी 2 लाखाची तरतूद केली आहे. म्युनिसिपल हायस्कूलच्या नवीन इमारत बांधकामासाठी 75 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीची 1 लाखाची तरतूद आहे. शिव-बसव, डॉ. आंबेडकर जयंती देणगीसाठी 2 लाख, बीपीएल कार्डधारकांना दहन व दफन विधीसाठी 5 लाख, म्युनिसिपल इंग्रजी शाळा शिक्षक पगार व इतर दुरुस्तीसाठी 22 लाख, विद्यार्थी गणवेश खरेदी 5 लाख, सफाई कर्मचारी आरोग्य तपासणी 4 लाख, प्राणी प्रसुती नियंत्रण, रॅबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी 3 लाख, वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी 1 लाख रु. अनुदान या तरतुदी कायम ठेवल्या आहेत.
14 लाखांचे शिलकी अंदाजपत्रक
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बुक बँकसाठी 6 लाख, म्युनिसिपल शाळा संगणक लॅबसाठी 10 लाख, नगरपालिका कार्यालय संगणक खरेदीसाठी 10 लाख, राणी लक्ष्मीबाई सुतिकागृह नूतनीकरण अनुदानकरिता 9 लाख, नगरपालिका वाहन खरेदीसाठी 25 लाखांच्या निधीची नव्याने तरतूद केली आहे. इतर खर्च, नवीन कामाचे खर्च व अधिकचा खर्च यासाठी 7 कोटी 1 हजाराची तरतूद होती.
यामध्ये 1 कोटी 83 लाख 50 हजाराची भर घालण्यात आली आहे. या सर्व तरतुदीतून 14 लाख 30 हजार 616 रुपयांचा शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यावेळी सर्व नगरसेवक, नगरसेविका, नागरिक उपस्थित होते.
प्रथमच सभेची सुरुवात राष्ट्रगीताने
नगरपालिका सभागृहात सभा सुरू होत असताना सुरुवातीला फक्त उपस्थितांचे स्वागत करून सभेची सुरुवात केली जायची. पण या सर्वसाधारण सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. यानंतर मृतांना अभिवादन करण्यात आले. यासाठी नगरसेविका आशा टवळे सूचक होत्या.
दहन-दफन निधी खर्च शून्य
नगरपालिकेच्या माध्यमातून शहर व उपनगरांतील मृतांच्या कुटुंबीयांसाठी 2500 प्रमाणे मदत देण्याकरीता 5 लाखाची तरतूद केली होती. बीपीएल कार्डधारकांसाठी असणाऱया या योजनेचा लाभ एकाही मृताच्या कुटुंबीयांनी घेतला नाही. यामुळे तरतूद निधी तसाच राहिला. बैठकीत सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये या विषयांवरून आरोप-प्रत्यारोप झाले. शेवटी प्रत्येक प्रभागात जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
3 टक्के करवाढीला मंजुरी
सभेच्या सुरुवातीला 3 ते 5 टक्के करवाढ करण्याविषयी चर्चा झाली. यामध्ये नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार यांनी परिस्थितीचा विचार करून कमीत कमी वाढ करावी, नगरसेविका अनिता पठाडे यांनी करवाढ जशी सर्वांसाठी आहे, त्याचप्रमाणे विकासकामेही सर्व प्रभागात करा. पाणी, पथदीप, स्वच्छता या समस्या गंभीर आहेत, असे सांगितले. नगरसेवक संजय सांगावकर यांनी सर्वांचा विचार व्हावा, नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी कमीत कमी करवाढ व्हावी. पण बाजार कर एक वर्षासाठी रद्द करावा, असे सांगितले. नगरसेवक संतोष सांगावकर यांनी नोंद नसणाऱया मालमत्ता नोंद करून उत्पन्न वाढवावे, असे सांगितले.