खरेदीसाठी आलेल्या गोव्याच्या महिलेचे 50 हजार रुपये लांबविले
प्रतिनिधी/ बेळगाव
बाजारपेठेत महिला पाकिटमारांचा उपद्रव वाढला आहे. महिलांच्या पर्समध्ये हात घालून रोकड लांबविण्याचे प्रकारही वाढले आहेत. शनिवारी साखळी-गोवा येथून खरेदीसाठी बेळगावात आलेल्या एका महिलेच्या पर्समधील 50 हजार रुपये रोकड लांबविण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
शनिवारी दुपारी 3.30 ते 4 यावेळेत पांगुळ गल्ली परिसरात ही घटना घडली असून ग्राहक भासवून दुकानात आलेल्या दोन महिलांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला असून यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे.
साखळी-गोवा येथील करुणा परांजपे या आपल्या कुटुंबीयांसह शनिवारी बेळगावात आल्या होत्या. त्यांनी आपली कार सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सोडून खरेदीसाठी बाजारपेठेत आल्या होत्या. पांगुळ गल्ली येथील एका दुकानात सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी पोहोचल्या. काऊंटरवर उभ्या असताना त्यांना एक कॉल आला. पर्समधील मोबाईल काढून कानाला लावेपर्यंत बाजूला थांबलेल्या दोन महिलांनी पर्समध्ये हात घालून 50 हजार रुपये पळविले.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला आहे. दुकान मालकांनी फुटेज पोलिसांना दिले असून 50 हजार रुपये रोकड लांबविणाऱया महिला गँगवाडी परिसरातील असल्याचा संशय बळावत चालला आहे. या संबंधी शनिवारी रात्री मार्केट पोलिसांशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाच-सहा महिलांची टोळी
रोज मुख्य बाजारपेठेत गँगवाडी परिसरातील पाच ते सहा महिलांची टोळी फिरत असते. या टोळीतील महिला खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पर्सकडे बघत असतात. संधी मिळाली की पर्समधील रोकड लांबविण्यात त्या तरबेज आहेत. त्यामुळे बाजारपेठेत पाकिटमारी करणाऱया महिलांचा उपद्रव वाढला असून पोलिसांनी त्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.