वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परराज्यातील आग्रा बटाटा 100 रुपये वधारला तर इंदूर बटाटा 100 रुपयांनी कमी झाला. हासन जवारी बटाटा आणि कांद्याचे भाव मात्र स्थिर होते. रताळी आवक वाढल्याने रताळी दर 300 रुपयांनी कमी झाले.
बेळगाव बाजारामध्ये शनिवारी कांदा आवक 55 ट्रक इतकी होती. त्यामध्ये कर्नाटकमधून 40 ट्रक असून त्यामध्ये 30 ट्रक नवीन तर 10 ट्रक जुना कांदा होता. तर महाराष्ट्रातून 15 ट्रक जुना कांदा आवक झाली होती. बेळगाव बाजारात आठवडय़ापासून नवीन सफेद कांदा कर्नाटकातील लोकापूर परिसरातून आवक होत आहे. आवकेच्या सुरुवातीला त्याचा भाव 2000 रुपये असा होता, अशी माहिती लेखापाल सुनील धामणेकर यांनी दिली. बाजारात कर्नाटकातील नवीन कांद्याचा भाव 500 पासून 2200 रुपये तर कर्नाटक, महाराष्ट्रातील जुना कांदा 1000 पासून 2500 रुपयांपर्यंत आहे.
सफेद कांद्याचे भाव- नवीन 1000 पासून 2200, जुना 2500 रुपये असा झाला.
शनिवारी बाजारात बटाटा उत्पादक क्षेत्रामधून 2000 पिशवी बटाटा आवक झाली होती. बाजारात आवक जावक समसमान असल्याने बटाटय़ाचे भावसुद्धा स्थिर असल्याची माहिती व्यापारी शंकर चव्हाण यांनी दिली. याशिवाय उत्तर प्रदेशमधून दोन व्यापारी बेळगाव बाजारात मुक्कामाला असल्याचे सांगण्यात आले. बाजारात जवारी बटाटा दर चांगल्या प्रतीचा गोळा बटाटा 3200 ते 3500, मध्यम 2000 ते 2500, गोळी 1000 ते 2000 असा होता.
बाजारात परराज्यातील बटाटा आवक वाढली. बुधवारच्या बाजारात 5 ट्रक आवक होती तर शनिवारी 12 ट्रक बटाटा आवक होती. यामध्ये इंदूर 4, आग्रा 2, हासन 6 ट्रक बटाटा आवक होती, अशी माहिती व्यापारी तुषार टुमरी यांनी दिली. बटाटय़ाचे भाव- इंदूर 3000 ते 3500, आग्रा 2800 ते 3100, हासन 3500 ते 3600 रुपये.
बुधवारपासून रताळी आवकेला सुरुवात झाली होती. बुधवारी 12 पोती रताळी आवक होती. त्याचा भाव 2000 रुपये असा होता तर शनिवारी 300 पोती रताळी आवक ही बेळगुंदी, कुदेमनी, बोडकेनहट्टी परिसरातून झाली होती. त्याचा भाव 1200 ते 1700 रुपये असा झाला असल्याची माहिती व्यापारी दत्ता पाटील यांनी दिली.