पंजाबच्या युवा फलंदाजाकडून दिल्लीविरुद्ध रणजी लढतीत आगळीक
मोहाली / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेटचा उगवता तारा शुभमन गिल शुक्रवारी आश्चर्यकारकरित्या वादाच्या भोवऱयात अलगद सापडला. दिल्लीविरुद्ध पंजाबच्या रणजी लढतीदरम्यान मैदानी पंचांनी बाद दिल्यानंतर शुभमनने थेट त्यांच्याविरुद्ध मैदानातच हुज्जत घालत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या या आगळिकीमुळे तब्बल 5 ते 7 मिनिटे खेळ थांबवावा लागला होता.
शुभमन गिल भारत अ संघाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार असून मध्यमगती गोलंदाज सुबोध भाटीच्या चेंडूवर यष्टीमागे झेलबाद दिले गेल्यानंतर या निर्णयावर त्याने जोरदार आक्षेप घेतला. पुढे सामनाधिकाऱयांनाही पाचारण केले गेले आणि चर्चेनंतर शुभमनला पुढे खेळ सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली.
मुख्य पंच मोहम्मद रफी यांनी बाद दिल्यानंतर शुभमनने थेट त्यांच्याकडे जात निर्णय फिरवण्याची मागणी केली. स्क्वेअरलेग पंच पश्चिम पाठक यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्य पंचांनी आपला निर्णय मागे घेतला, असे दिल्लीचे संघव्यवस्थापक विवेक खुराणा याप्रसंगी म्हणाले. पंचांनी दिलेला निर्णय पुन्हा बदलला असला तरी आमचा संघ सामन्यावर बहिष्कार टाकणार नव्हता, असेही ते म्हणाले.
पंचांशी हुज्जत घातल्यामुळे शुभमनकडून शिस्तपालन नियमांचा भंग झाला असून सामनाधिकारी पी. रंगनाथन त्याच्याशी संवाद साधतील. त्याला समज देऊन सोडून दिले जाईल किंवा प्रथमस्तरीय अपराध ग्राहय़ धरत त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे संकेत आहेत.
पंचांशी हुज्जत घातली, त्यावेळी गिल 10 धावांवर खेळत होता. पण, पुन्हा संधी मिळाल्यानंतर त्याला याचा फारसा लाभ झाला नाही. त्याने 41 चेंडूत 23 धावा जमवल्यानंतर तंबूचा रस्ता धरला. संघाच्या खात्यावर 60 धावा असताना सिमरनजीत सिंगच्या गोलंदाजीवर अनूज रावतकडे झेल देत त्याला परतावे लागले.
कोटस
शुभमन गिलने पंचांशी कोणताही वाद घातलेला नाही. तो फक्त चेंडूने बॅटची कड घेतलेली नाही, इतकेच त्यांना सांगत होता. शुभमन अतिशय संयमी आणि समतोल खेळाडू आहे, याची आपल्या सर्वांनाच पूर्ण कल्पना आहे.
-पंजाब क्रिकेट संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी जीएस वालिया
सामना 7 ते 8 मिनिटे थांबला होता. गिल बाद होता, याची आमच्या खेळाडूंना कल्पना होती आणि यामुळेच, पंचांनी निर्णय फिरवल्यानंतर तो का फिरवला याची विचारणा आमच्या खेळाडूंनी केली. तरीही आम्ही या विरोधात तक्रार दाखल करणार नाही. आमच्यासाठी हा मुद्दा संपला आहे.
-दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव विनोद तिहारा