बुधवारी सापडले 480 रुग्ण
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील गावागावांमध्ये कोरोना पसरला असून बुधवारी या संसर्गातून बाधा झालेल्या तिघांनी आपले प्राण गमावले. बाधितांचा आकडाही वाढत असून बुधवारी नव्याने 480 जणांना बाधा झाली. केवळ 161 जण बरे होऊन घरी गेले. दरम्यान बाधितांची संख्या 9924 झाली असून आज बाधितांचा आकडा 10 हजार पार करणार आहे. कोरोनामुळे सक्रिय असलेल्यांची संख्या 3194 पर्यंत पोहोचली आहे. नव्याने 3 जण दगावल्याने आतापर्यंत या संसर्गाने मरण पावणाऱयांचा आकडा 89 पर्यंत पोहोचला आहे. कोविड इस्पितळात अद्याप काही जणांची प्रकृती नाजूक बनल्याचे वृत्त आहे.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसांगणिक वाढत आहे. आतापर्यंत 9924 जण बाधित झाले आणि 3194 सक्रीय आहेत. बरे होणाऱयांची संख्या 6641 एवढी आहे. बुधवारी पीर्ण येथील 74 वर्षांचा एक इसम कोविड इस्पितळात मरण पावला तर 62 वर्षीय मांगोरहिल वास्को येथील एक ज्येष्ठ व्यक्तिनेही कोरोना इस्पितळ मडगाव येथे अखेरचा श्वास घेतला. बायणा वास्को येथील 62 वर्षीय एक महिला गोमेकॉमध्ये उपचार घेत असताना मरण पावली. बुधवारी एकूण 3575 प्रकरणांची तपासणी केली असता त्यातील 2520 जणांचा अहवाल नकारात्मक आला तर 480 जणांचा अहवाल सकारात्मक आला. अद्याप 575 जणांचा अहवाल येणे बाकी आहे.
पणजीत रुग्णांची संख्या वाढतीच
राजधानी पणजीमध्ये नव्याने 15 रुग्णांची भर पडल्याने पणजीत एकूण रुग्ण संख्या आता 148 झाली आहे. डिचोली -14, सांखळी 93, पेडणे 79, वाळपई 121, म्हापसा 107, हळदोणा 38, बेतकी 35, कांदोळी 82, कासारवर्णे 22, कोलवाळ 69, खोर्ली 86, चिंबल 179, शिवोली 29, पर्वरी 70, मये 64, कुडचडे 56, काणकोण 26, मडगाव 309, वास्को 409, बाळ्ळी 51, कासावली 72, चिंचिणी 10, कुठ्ठाळी 252, कुडतरी 85, लोटली 47, मडकई 60, केपे 77, सांगे 78, शिरोडा 57, धारबांदोडा 120, फोंडा 176 व नावेली 60 एवढे कोरोना रुग्ण सध्या आहेत.
केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनाही बाधा
दस्तुरखुद्द केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक तसेच त्यांच्या पत्नी सौ. विजया या देखील कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने एकच खळबळ झाली. मंत्र्यांच्या संपर्कात काही नातेवाईक व मित्रमंडळी आली होती. त्यामुळे त्यांनाही बाधा झाल्याचे वृत्त आहे. आयुर्वेदाचा जास्तीत जास्त प्रसार करणारे आणि आयुष मंत्रालयाने कोरोनावर उपाययोजना तसेच प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱया होमियोपथी गोळ्या गोव्यात तसेच देशात सर्वत्र वाटल्या खऱया, परंतु मंत्री स्वतःच कोरोनाबाधित झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ते होम क्वॉरंटाईन झालेले आहेत. आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी ट्व्टिर द्वारे जनतेला कळविले आहे. मोदी सरकारातील 4 मंत्री या अगोदर कोरोनाबाधित आहेत. आता श्रीपाद नाईक हे देखील बाधित झाल्याने केंद्रातील पाच मंत्री आजारी पडले आहेत.