अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार, 29 जून 2021, सकाळी 11.45
● सोमवारी अहवालात 779 बाधित ● पॉझिटिव्हीटी दर 9.07 टक्क्यांवर ● 8,585 जणांचे नमुने तपासले ● जिल्ह्यात 3,001 बेड रिक्त ● ऑक्सिजनसह 2,112 बेड रिक्त ● लॉकडाऊनची तलवार टांगतीच
सातारा / प्रतिनिधी :
दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातून आता सावरतो आहे, असे वाटत असतानाच पूर्ण फेब्रुवारी महिन्यात तीन अंकी कोरोना बाधित वाढीच्या संख्येचा रतीब सुरू होता. तो थोडा खाली आल्याचा दिलासा घेत मिळालेल्या लॉकडाऊन मधील शिथिलतेमुळे नागरिक जगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच पुन्हा गेल्या दोन-तीन दिवसात वाढलेला पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार घेऊन उभा आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात हजारांच्या संख्येने बाधित समोर आले तर शनिवारी रात्रीच्या अहवालात 977 जणांचा अहवाल बाधित आल्याने जिल्ह्यात पुन्हा चिंता वाढत असतानाच रविवारी रात्रीच्या अहवालात बाधित वाढीचा आलेख खाली घसरला मात्र सोमवारी रात्री च्या अहवालात 779 जणांचा अहवाल बाधित आलेला असून पॉझिटिव्हिटी रेट 9.07 टक्के एवढा वाढला आहे.
दुसरी संपलेली नाही तिसरीची तयारी
ज्या कोरोना आजारावर कोणताही ठोस उपाय नाही त्याच्या जगभरात लाटेवर लाटा येत आहेत आणि याबाबत आता खुद्द प्रशासनाकडून याची भविष्यवाणी वर्तवण्यात येत आहे. ‘कोरोना नेमका कसा, ज्याला जसा हवा तसा’ असेच नागरिक आता म्हणू लागलेले आहेत. कारण मागे काही ज्योतिषांनी ही लाट एक वर्षभरात संपेल किंवा आणखी काही अशी भविष्यवाणी वर्तवली होती. त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला होता, मात्र आता खुद्द शासनच कोरोना बाबत पुढे काय होणार हे सांगू लागले आहे नेमका या बाबतीतच नागरिकांचा आक्षेप आहे. त्यामुळेच दुसरी संपलेली नाही आणि तिसरीची कसली तयारी करताय? असा सवाल नागरिक करू लागले आहेत.
पॉझिटिव्हिटी दर 9.07
सोमवारी रात्री आलेल्या अहवालानुसार 8,585 जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत यामध्ये 779 जणांचा अहवाल बाधित आला त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 9.07 एवढ राहिला आहे. यामध्ये 6,769 जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आलेले असून त्यामध्ये 582 बाधित आलेले आहेत तर 1,816 जणांची rt-pcr टेस्ट आल्यानंतर 197 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये rt-pcr टेस्टचा पॉझिटिव्हिटी दर 10.85 एवढा आहे. कालच जिल्हादंडाधिकारी यांनी आता पुढील निर्बंध बाबतचा निर्णय rt-pcr च्या पॉझिटिव्हिटी रेट वर घेण्यात येणार असल्याचे जाहीर केलेला आहे. हा दर पाहता त्यामुळे जिल्ह्यावर लॉक डाऊनची तलवार टांगती आहे.
दुसरी लाट, डेल्टा फील्टा काही नाही
शासन-प्रशासन दुसऱ्याला त्यातून सावरले नसतानाच पुन्हा तिसऱ्याला ते सज्ज राहण्याच्या तयारीला लागले मात्र त्यासंदर्भात जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजवर यासंदर्भातील बातमीवर सातारकर प्रचंड व्यक्त झालेले आहेत. त्यामध्ये एकाने तर सरकार, डॉक्टर, पोलीस, न्यूज चॅनेल वाल्यांची नौटंकी असल्याचा आरोप केलेला आहे. आता परत डॉक्टर जाणून बुजून लोकांना चुकीची ट्रिटमेंट देऊन मारणार, नंबर वाढवणार, पोलीसांचे फटके आणि वसूली चालू राहणार अशी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी सगळे २०२० पासून घरबशे गुलाम आणि लाचार झाले असून कोणीही ह्या दळिंद्री सरकारचा विरोध करणारच नाही असा संतापही व्यक्त केलेला आहे. आपण आपल्या नजरेत मस्करी होउन बसलोय. दळिंद्री सरकार कसलीच मदत करणार नाही फक्त मारहाण वसूली करत आहे आणि आमचे जीवन कुत्र्यासारखे झाले असल्याची भाऊ नाही व्यक्त झालेली आहे.
जिल्हय़ात 3,001 बेड रिक्त
आजमितीस जिल्हय़ात कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये 4,837 एकूण बेड संख्या आहे. यामध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,836 एवढी असून हॉस्पिटलमध्ये 3,001 बेड रिक्त आहेत. कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये आयसीयू व्हेंटीलेटरसह 82 बेड, आयसीयू व्हेंटिलेटरविना 237, ऑक्सिजनसह 2,112 बेड आणि ऑक्सिजनविना 570 असे 3,001 बेड रिक्त आहेत.
सोमवारी 2,385 जणांनी घेतली लस
जिल्हय़ात लसीकरणाचा वेग वाढू लागला असून उपलब्ध साठय़ानुसार लसीकरण सुरु आहे. लसीकरणाची आकडेवारी मंगळवारी गतीने वाढत असून सोमवारी एका दिवसात 2 हजार 385 जणांनी लस घेतली आहे. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 7 लाख 62 हजार 257 झालीय. तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 1 लाख 56 हजार 402 झाली असून एकूण लस घेतलेल्यांची संख्या 8 लाख 62 हजार 659 एवढी झालीय.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने 10,57,972, एकूण बाधित 1,91,931, एकूण कोरोनामुक्त 1,79,031, मृत्यू 4,345, उपचारार्थ रुग्ण 9,599
सोमवारी जिल्हय़ात बाधित 497, मुक्त 1,085, बळी 9