निपाणीसह ग्रामीण भागात गणेश विसर्जन : काही मंडळांकडून परंपरेची जोपासणा : पांरपरिक वाद्यांचा गजर : समिश्र प्रतिसादातून गणरायाला निरोप
प्रतिनिधी /निपाणी
यंदाच्या गणेश चतुर्थीवरही कोरोनाचे संकट होतेच. ते आटोक्यात यावे यासाठी प्रशासनाने सण साजरा करण्यासाठी काही अटी व नियम लागू केले होते. त्याची अंमलबजावणी करताना निपाणीतील काही मंडळांनी त्याला प्रतिसाद दिला. विधायक उपक्रमातून गणरायाची भक्ती करणाऱया कार्यकर्त्यांच्या समजुतीच्या धोरणामुळे शहरातील उत्सवाला गालबोट लागले नाही. 10 ते 19 सप्टेंबरअखेर साजरा करण्यात आलेला गणेशोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. 19 रोजी अनंतचतुर्थी निमित्त आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे मन भरुन आले होते. शहरात ठिकठिकाणी बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बाप्पा मोरया।़।़।़ पुढच्या वर्षी लवकर या! अशी प्रार्थना करत दिवसभरात सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
निपाणी शहरात लहान व मोठय़ा अशा जवळपास 150 मंडळे आहेत. त्या सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांना कोरोना फैलाव थांबविण्यासाठीचे उपाय आणि नियम याची कल्पना पोलीस, नगर पालिका व आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली होती. 10 रोजी गणरायाचे आगमन होताच सर्वत्र आनंद आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. नियमीत आरती व अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घेतला.
14 रोजी घरगुती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचदिवशी शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांनी मूर्ती विसर्जन केले. त्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्त्यांना केलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले. ठराविक कार्यकर्त्ते व डॉल्बीच्या वापराला फाटा देत अनेक मंडळांनी टाळय़ांच्या गजरात आणि बाप्पांचा नामघोष करत गणरायाला निरोप दिला. मंगळवारी गणरायाला निरोप कसा द्यायचा?, या विचारात अडकलेल्या कार्यकर्त्यांनी बुधवारी तर काही कार्यकर्त्यांनी शनिवारी मिरवणुकीच्या माध्यमातून मूर्ती विसर्जन केले.
येथील दौलत मळा या भागात सायंकाळपर्यंत शहरातील 15 ते 20 मंडळांनी दिवसभरात मूर्ती विसर्जन केले. श्रीनगर 3 री गल्लीतील श्रीगणेश कला, क्रिडा, सांस्कृतिक मंडळाने अध्यात्मिकता जोपासत भजनी मंडळाच्या तालावर विसर्जन केले. या मंडळातील सागर संकपाळ, अरुण बेळगावे, श्रीनिवास चव्हाण, लक्ष्मण पवार, हरीष रजपूत, सचिन पाटील, बबलू भोसले, सुनील भोसले व कार्यकर्त्यांनी गोळा केलेली रक्कम महाप्रसाद, डॉल्बी व इतर खर्चासाठी न वापरता अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य, गरीबांना अन्नदान यासाठी खर्च केले. तर महिलांमध्ये जागृती व्हावी, त्यांना आत्मिकबळ मिळावे यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अशाच पद्धतीचे अनेक उपक्रम शहरातील अनेक मंडळांनी यंदा आयोजित करुन प्रशासनाला दिलासा दिल्याचे पहावयास मिळाले.
अनूचित प्रकाराकडे लक्ष
शहरातील अनेक मंडळांनी बाप्पांच्या उत्सवाला विधायक बनवत सण साजरा केला. साध्या पद्धतीने गणरायाची मूर्ती मंडपात स्थापित केली. गर्दी टाळत कार्यक्रमही केले. असे असले तरी कोणतीही अनूचित घटना घडू नये, याकडे प्रशासनाची करडी नजर होती. नियमावलीनुसार मूर्ती विसर्जन पाचव्या दिवशी होणार का?, अशी द्विधा मनःस्थिती निर्माण झाली होती. अखेर कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहून योग्य नियोजनाद्वारे अनंत चतुर्थीपर्यंत काही मंडळांना मुभा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. असे असले तरी काही ठिकाणी डॉल्बीचा ठेका ऐकावयास मिळाला.
पोलिसांचे नियोजन
निपाणी शहरातील काही मोजक्या मंडळांनी दिवसभरात मूर्ती विसर्जन केले. शहराबाहेर असणाऱया दौलत मळा, चौगले मळा, जत्राटवेस, पट्टणकुडी माळ, शिरगुप्पी रोड मार्गावर असणाऱया विसर्जन ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. निपाणी शहर, बसवेश्वर व ग्रामीण पोलिस स्थानकाने केलेल्या नियोजनानुसार विसर्जनातील अडथळे दूर झाल्याचे पहावयास मिळाले.