सर्वात स्वस्त किंमतीत होणार उपलब्ध – वर्षअखेरपर्यंत बाजारात येणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बायोलॉजिकल-ई तयार करत असलेली आरबीडी प्रोटीन सबयुनिट व्हॅक्सिन कॉर्बेव्हॅक्स (Corbevax) ही भारतातील सर्वात स्वस्त लस ठरू शकते. ही कोरोना प्रतिबंधक लस 250 रुपयात उपलब्ध होणार असून दोन्ही डोस केवळ 500 रुपयात लाभार्थींना मिळू शकतील, अशी माहिती कंपनीच्या संचालक महिमा डाटला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लस कॉर्बेव्हॅक्सच्या निर्मितीसाठी बायोलॉजिकल-ई सोबत करार केला आहे. सरकारकडून यासाठी बायोलॉजिकल-ई कंपनीला 1,500 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंट करण्यात आले आहे. ऑगस्ट ते डिसेंबर 2021 दरम्यान बायोलॉजिकल-ई कंपनीकडून या लसीचे 30 कोटी डोसेस तयार करण्यात येणार आहेत.
सध्या वापरात असलेल्या सीरम इन्स्टिटय़ूटच्या कोव्हिशिल्ड लसीचा एक डोस राज्य सरकारला 300 रुपयांना आणि खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना मिळत आहे. तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा एक डोस राज्य सरकारला 400 रुपयांना आणि खासगी रुग्णालयांना 1,200 रुपयांना मिळत आहे. रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीचा एक डोस 995 रुपयांना मिळत आहे. वरील लसींच्या किंमतीच्या तुलनेत कॉर्बेव्हॅक्स लसीची संभाव्य किंमत कमी आहे. फक्त 110 रुपयांचा खर्च कॉर्बेव्हॅक्स लस उत्पादन करण्यासाठी येतो. या लसीच्या दोन्ही डोसेसची किंमत 400 रुपयांपर्यंत देखील असू शकते, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कॉर्बेव्हॅक्स ही लस हेपॅटायटीस-बी लसीसारखी बनवली असून तिचा वापर पारंपरिक पद्धतीने केला जाणार असल्याचेही समजते.
लसी वाढविण्यासाठी जोरदार हालचाली
सध्या देशात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमची कोव्हिशिल्ड या दोन लसी लसीकरण मोहिमेत वापरण्यात येत आहेत. रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली असून लसीच्या उत्पादनासाठी देखील सीरम इन्स्टिटय़ूटला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर ही लस देखील लसीकरण मोहिमेत सहभागी होईल. त्यात आता कॉर्बेव्हॅक्स लसीची देखील भर पडणार आहे.