कार्यकारी मंडळाच्या बैठकांसमोर मांडणार
प्रतिनिधी / पणजी
बारावी परीक्षेच्या गुणांकनाचा मसुदा (ड्राफ्ट) तयार करण्यात आला असून तो गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (गोवा बोर्ड) दोन बैठकांसमोर मांडण्यात येणार आहे. गोवा बोर्डाची कार्यकारी मंडळाची बैठक आज शनिवारी दि. 12 जून रोजी सकाळी 11.30 वा. तर सर्वसाधारण सभा सोमवार दि. 14 जून रोजी 11 वा. ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. बोर्डाच्या सचिव गोराल्डिना मेंडीस यांनी दोन्ही बैठकांची नोटीस जारी केली असून ती सर्व संबंधितांना पाठवली आहे.
बारावीचा गुणांकन मसुदा त्यासाठी नेमलेल्या 11 सदस्यीय समितीने तयार केला असून त्यावर चर्चा करणे हा प्रमुख विषय बैठकीसमोर आहे. बारावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे हा गुणांकन मसुदा तयार करण्याची पाळी बोर्डावर आली आहे. त्याशिवाय या अगोदर झालेल्या विविध सभांचे इतिवृत्त मंजूर करणे हा दुसरा विषय बैठकीत चर्चेला येणार आहे.
दहावी-बारावी विद्यार्थ्यांना अंतर्गत परीक्षेतील कामगिरीवर आधारित गुण देण्यात येणार असून हाच मसुदा थोडाफार फरक करून दहावीसाठी निकालाकरीता वापरला जाणार आहे. बोर्डाने त्याकरीता जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. दरम्यान दहावी-बारावीचे विद्यार्थी, पालक हा निकाल कसा असणार याची प्रतीक्षा करीत असून पुढची दिशा ठरवण्यात मग्न आहेत. बोर्ड निकाल कधी लावणार यावरच दोन्ही इयत्तेतील विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून रहाणार आहे.