तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
बार्शी येथील कृषी सहाय्यक अंगद घुगे यांच्या हत्या प्रकरणी पहिला संशयीत म्हणून त्यांचा मुलगा विशाल अंगद घुगे याला ताब्यात घेतले. कुर्डुवाडी पोलिसांनी उस्मानाबाद येथून रविवार रात्री उशिराने १२.४५ वा. विशालला ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी दुपारी माढा येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सय्यद यांच्या समोर उभे केले असता त्याला २५ तारखेपर्यंत ५ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. १७ रोजी बार्शी येथील कृषी सहाय्यक अंगद घुगे यांची निघृण हत्या करुन त्यांचा मृतदेह माढा तालुक्यातील लऊळ शिवारात आणून जाळण्यात आल्याचे उघड झाले होते. या खुनात वापरलेली स्कार्पिओ गाडी शनिवारी रात्री पोलिसांनी जप्त केली. गाडीतील रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. कटातील गाडी पोलिसांच्या हाती लागताच तपास चक्रे अधिक वेगाने सुरु झाली असून पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे.