वृत्तसंस्था / माद्रिद :
बार्सिलोनाने इस्पॅनियोलचा पराभव करून ला लिगा स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याच्या अंधुक आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात लुईस सुआरेझचा एकमेव गोल निर्णायक ठरला.
या सामन्याच्या उत्तरार्धातील सहाव्या मिनिटाला अन्सू फॅटी व पोल लोझॅनो यांना पंचांनी मैदानाबाहेर काढल्याने दोन्ही संघांना उर्वरित वेळेत दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. याचा लाभ नंतर सुआरेझने घेत बार्सिलोनाचा एकमेव गोल नोंदवला. अँटोईन ग्रीझमनने लायोनेल मेस्सीला बॅकहील पास पुरविल्यावर मेस्सीने त्यावर जोरदार फटका मारला. पण तो गोलरक्षकाच्या हातातून रिबाऊंड झाला, त्यावर ताबा मिळवित सुआरेझने चेंडू जाळय़ात धाडला.
रविवारी बार्सिलोनाने व्हिलारेलवर 4-1 असा मोठा विजय मिळविला होता. पण त्यांची ती चमक या सामन्यात दिसून आली नाही. या विजयानंतर बार्सिलोना व रियल माद्रिद यांच्यातील अंतर केवळ एका गुणावर आले आहे. शुक्रवारी रियल माद्रिदचा सामना ऍलावेसशी होणार आहे. रियल माद्रिदला जेतेपदासाठी फेव्हरिट मानले जात आहे.
इस्पॅनियोल संघ तळाच्या स्थानावर असून पदावनती टाळण्यासाठी त्यांना अद्याप 11 गुणांची गरज आहे. मात्र त्यांचे फक्त तीन सामने बाकी राहिले आहेत. त्यामुळे त्यांची पदावनती होणार हे निश्चित आहे. ‘रियल माद्रिद काय करतो, हे पाहण्यापेक्षा आम्हाला पुढील तिन्ही सामने जिंकण्याचाच प्रयत्न करावा लागेल. त्यांनी गुण गमविला तर ते आमच्यासाठी चांगलेच असेल. पण आम्हाला प्रयत्नांत कसूर करून चालणार नाही,’ असे सुआरेझ सामन्यानंतर म्हणाला. इस्पॅनियोलला या सामन्यात विजयाची गरज होती. पण 2009 नंतर लीगमध्ये त्यांनी एकदाही बार्सिलोनावर विजय मिळविलेला नाही.