संपूर्ण कमिटीच बरखास्त करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
बार असोसिएशन अध्यक्षपदी डी. एम. पाटील यांची निवड झाल्यानंतर वकिलांनी तीव्र विरोध केला आहे. ही निवड बेकायदेशीर असून बार असोसिएशनच्या कमिटीने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचा आरोप काही वकिलांनी केला आहे. त्या विरोधात न्यायालयाच्या आवारासमोरच वकिलांनी आंदोलनाला सुरुवात केली. यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. सध्या कोरोना असल्यामुळे हे आंदोलन मागे घ्यावे, असे जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितले. त्यामुळे सांकेतिक आंदोलन करून दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले.
बार असोसिएशन अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ यांचे निधन झाल्यानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त होती. त्या ठिकाणी ऍड. दिनेश पाटील यांची निवड करण्यात आली. बार असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र वकिलांना विश्वासात घेतले नाही, म्हणून त्याला तीव्र विरोध करण्यात आला आहे. ही निवड चुकीच्या पद्धतीने झाली आहे. वास्तविक सर्वसाधारण बैठक घेऊन त्या बैठकीत वकिलांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानंतर निर्णय घेणे महत्त्वाचे होते. मात्र तसे करण्यात आले नाही, असा आरोपही करण्यात
आला.
संपूर्ण कमिटीच बरखास्त करावी वकिलांना विश्वासात न घेता कमिटीने अध्यक्ष निवडला, ही प्रक्रिया पूर्ण चुकीची आहे. मत मागण्यासाठी वकिलांकडे सर्वजण येतात. मात्र कोणताही निर्णय घेताना वकिलांना विश्वासात घेतले जात नाही, हे पूर्ण चुकीचे आहे. तेव्हा ही संपूर्ण कमिटीच बरखास्त करावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे. माजी अध्यक्ष एस. एस. किवडसण्णावर, ऍड. रवी इंगळगी, ऍड. सलीम सय्यद यांच्यासह वकील उपस्थित होते.