प्रतिनिधी / बेळगाव
बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. वडगाव येथील एका ग्राहकाला मागील वर्षभरापासून लँडलाईन फोन बंद असतानाही इनकमिंगचे पैसे भरावे लागले आहेत. लॉकडाऊनपूर्वी कनेक्शन बंद करा, असा अर्ज करूनही अद्याप तो बंद करण्यात आलेला नाही. कनेक्शन बंद नसल्याने पुन्हा पैसे भरण्यासाठी वारंवार फोन केले जात आहेत. यामुळे चूक नसतानाही ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
विष्णू गल्ली, वडगाव येथील परशराम धामणेकर यांचा लँडलाईन फोन वर्षभरापासून बंद आहे. तरीदेखील त्यांना इनकमिंग कॉलचे बिल देण्यात येत होते. फोन बंद असल्याची तक्रार वडगाव येथील बीएसएनएल कार्यालयात करण्यात आली. परंतु त्यांच्याकडून योग्य दखल घेण्यात आली नाही. कर्मचारी चालढकल करीत असले तरी महिन्याला बिल मात्र पाठविण्यात येत होते. माहिती नसल्याने परशराम धामणेकर हे महिन्याला ते बिल भरत
होते.
लॉकडाऊनच्या काळात वडगाव येथील कार्यालय बंद करण्यात आले. यामुळे धामणेकर यांनी मुख्य बीएसएनएल कार्यालयात जाऊन तक्रार केली. परंतु त्यांच्याकडूनही दखल घेण्यात आली नाही. कनेक्शन बंद करण्यासाठी त्यांनी अर्ज केला. त्यावेळी त्यांना आधारकार्ड व बँक पासबुकचे झेरॉक्स देण्यास सांगण्यात आले. परंतु अद्याप कनेक्शन बंद करण्यात आले नसून इनकमिंग बिल पाठविण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
वारंवार कार्यालयाच्या माराव्या लागताहेत चकरा
बीएसएनएलच्या गलथान कारभाराचा फटका मला सहन करावा लागत आहे. ज्ये÷ व्यक्ती असूनही वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. कनेक्शन बंद करा, असे कळवूनही ते बंद करण्यात येत नसून महिन्याला बिल मात्र पाठविले जात असल्याचे त्यांनी सांगितले..
-परशराम धामणेकर