प्रतिनिधी / खानापूर
येथील देसाई गल्लीतील बाल मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-भगवा रक्षक संघटनेने पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून अद्ययावत रुग्णवाहिका जनसेवेसाठी उपलब्ध केली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा देसाई गल्लीत बुधवारी पार पडला. प्रारंभी प्रकाश देशपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून रुग्णवाहिका घेण्यामागचा उद्देश विशद केला.
त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद कपिलेश्वरी यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. तर निरंजन सरदेसाई व प्रशांत खासनिस यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे अनावरण झाले. या रुग्णवाहिकेसाठी खानापुरातील जैन श्वेतांबर संघाच्यावतीने 60 हजार रु. खर्च करून स्टेचर देण्यात आले आहे. त्याची पूजा जैन श्वेतांबर समाजातील ज्येष्ठ नागरिक सुभाष कोठारी यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच ध्वजाचे पूजन राजू फासलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन, फस्टेडची सुविधाही ठेवण्यात आली आहे. सदर रुग्णवाहिका घेण्यासाठी बाल मंडळ गणेशोत्सव मंडळ तसेच विविध सामाजिक संस्था व व्यक्तींनी हातभार लावला. त्यामध्ये हुबळी-धारवाड येथील पीयुसी 93 बॅचमधील अमर जोरापूर व त्यांच्या मित्रमंडळीकडून 50 हजार रुपये, सातेरी माउली मिलन खानापूर 50 हजार, जांबोटी मल्टिपर्पज सोसायटी 11 हजार रु., व वैयक्तिक स्वरुपात आर्थिक मदत प्राप्त झाली आहे.
या समारंभाला ऍड. सुभाष देशपांडे, नगरसेवक विनोद पाटील, ऍड. सिद्धार्थ कपिलेश्वरी, राजू देसाई, प्रसाद खासनिस, विद्याधर बनोशी, हणमंत सुतार, सर्वज्ञ कपिलेश्वरी, माजी नगरसेवक दिलीप पाटील, माजी नगरसेवक दिनकर मरगाळे, आप्पा पाटील, माजी नगरसेवक विजय रजपूत, अभिजीत सरदेसाई, राघवेंद्र गुरव, महादेव कादोळकर, सुधीर माळगी, अरविंद कुलकर्णी, केदार दामले, रोहीत साखळकर, संदीप टोपाजीचे, कुमार थंगम, विजय होळणकर, सागर पाटकर, संजय परीट, रुपेश हडीलगेकर, पिंटू साळुंखे, सदानंद राजपूत, संजय सरदेसाई, अभय सरदेसाई, प्रकाश देसाई, प्रशांत महाजन, प्रभाकर चिनवाल, अमित होळसंग, सुधीर जाधव यासह कार्यकर्ते तसेच जैन श्वेतांबर समाजबांधव उपस्थित होते. या रुग्णवाहिकेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही मोठे सहकार्य मिळाले आहे. सध्या ही रुग्णवाहिका महालक्ष्मी सांसर्गिक व आपत्ती निवारण संघटनेच्यावतीने शांतीनिकेतनमध्ये सुरू केलेल्या कोरोना सेंटरमध्ये ठेवली आहे.
कोरोना संसर्ग संपल्यानंतर सदर रुग्णवाहिका जनसेवेसाठी देसाई गल्लीमध्ये ठेवली जाणार आहे.