प्रतिनिधी / कुंकळ्ळी
बुरिंग-बाळळी येथील शंकर येसो फळदेसाई (वय 62) यांचे मंगळवार 15 रोजी दुपारी बांबोळी येथे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शनिवारी त्यांना बांबोळी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारीच सायंकाळी बुरिंग येथील जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. शंकर फळदेसाई हे काणकोणच्या मल्लिकार्जुन विद्यालयाचे निवृत्त शारीरिक शिक्षक होते. हायस्कूलच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान राहिले होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल या खेळांत अनेक मुले पुढे आली होती तसेच खो-खो खेळात दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार लाभले होते. त्यांना कबड्डी खेळात राज्यपातळीवर तीन वेळा, तर व्हॉलीबॉल खेळात दोन वेळा पुरस्कार लाभले. फळदेसाई हे बाळळी येथील श्री शांतादुर्गा बाळळीकरीण संस्थानच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. कोणत्याही कार्यात नेहमी ते हिरिरीने भाग घेत असत. सामाजिक कार्यातही त्यांचा तितकाच वाटा होता. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्यापश्चात पत्नी आशा फळदेसाई, मुलगी ऐश्वर्या, पुत्र यश व आई मंगला फळदेसाई असा परिवार आहे.