वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजाराचा नव्या विक्रमांचा प्रवास कायम सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 221 अंकांनी वधारुन नवा विक्रम प्राप्त करत बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. सदरच्या मजबूतीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लि. यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 221.32 अंकांनी वधारुन निर्देशांक 52,773.05 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 57.40 अंकांच्या वाढीसोबत निर्देशांक 15,869.25 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील कामगिरीमध्ये एशियन पेन्ट्सचे समभाग 3 टक्क्यांनी सर्वाधिक नफा कमाईत राहिले आहेत. यासह ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग सकारात्मक वातावरणात राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. दुसऱया बाजूला बजाज फिनसर्व्ह, डॉ.रेड्डीज लॅब, टायटन, सन फार्मा, बजाज फायनान्स आणि पॉवरग्रिड कॉर्पसह अन्य काही कंपन्यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव काहीसा कमी होत असून दुसरीकडे देशातील काही राज्यांमध्ये लॉकडाऊनमधून शिथिलता मिळत असून लसीकरणासही वेग निर्माण होणार असल्याच्या अंदाजामुळे गुंतवणूकदारांमधील विश्वास वाढण्यास मोठी मदत झाली आहे. याचा फायदा हा भारतीय शेअर बाजाराला होत असल्याचेही यावेळी अभ्यासकांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमध्ये टोकीयो आणि सोल हे बाजार तेजीत तर शांघाय आणि हाँगकाँग हे मात्र घसरणीसह बंद झाले आहेत. युरोपातील प्रमुख बाजारात प्रारंभीच्या दरम्यान तेजीकडे कल राहिला आहे.