थेट टक्कर मुकेश अंबानींच्या रिटेलसोबत – कंपनीकडून व्यवहाराच्या आकडेवारीचा खुलासा नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा डिजिटलने ऑनलाईन ग्रॉसरी बिगबास्केटमध्ये सर्वाधिक हिस्सोदारीचे अधिग्रहण केले आहे. या व्यवहारासोबत देशातील सर्वात मोठय़ा टाटा समूहाची आता रिटेल क्षेत्रामधील मुकेश अंबानींची रिलायन्स रिटेल, ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यासारख्या दिग्गज कंपन्यांना थेट टक्कर असणार आहे. मात्र यावेळी टाटा डिजिटलने यासंदर्भात झालेल्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु रेग्युलेटरी फायलिंगच्या माहितीनुसार कंपनीने बिगबास्केटमधील जवळपास 64 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी केली आहे.
बिगबास्केटच्या मंडळाने चालू आठवडय़ात या व्यवहाराला मंजुरी दिली होती आणि टाटा डिजिटलने बेंगळूर येथील स्टार्टअप कंपनीमध्ये 20 कोटी डॉलर्सची सुरुवातीला गुंतवणूक केली आहे. बिगबास्केटमधील सर्वाधिक समभागधारक हे चीनची कंपनी अलिबाबा समूह आणि ऍक्टिस एलएलपी आता बाहेर पडले आहेत. भारतीय प्रतिस्पर्धी आयोगाने मागील महिन्यातच सदरच्या व्यवहाराला हिरवा कंदील दिला होता.
डिजिटल व्यवसायावर भर
बिगबास्केट आणि ऑनलाईन फार्मसी 1 एमजीनंतर टाटा समूहाची नजर फिटनेस स्टार्टअप क्योरफिटवर आहे. आता टाटाची रिटेल क्षेत्रामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ऍमेझॉन यांच्यासोबत टक्कर राहणार असल्याचे संकेत व्यक्त होत आहेत. यासह अन्य काही कंपन्या या व्यवसायात वेगाने प्रवेश करत असल्याचे पहावयास मिळत आहे.