वार्ताहर / कास :
कास परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून पशुधनावर हल्ले वाढत आहेत. बुधवारी दुपारी जुंगटी गावातील कालवडीचा बिबट्याने फडशा पाडल्याची माहीती समोर येत असतानाच शुक्रवारी सायंकाळी पारांबे गावातील शेळीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात शेळी गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन चितेंत वाढ झाली आहे.
बुधवारी जुंगटी गावातील शेतकरी कोंडीबा बजरंग कोकरे यांची जनावरे खडकाळी नावाच्या शिवारात चरावयास गेली होती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कालवडीवर हल्ला केला. त्यामुळे सर्व जनावरांची पळापळ झाली. त्यानंतर जनावरांपाठोपाठ कोडींबा कोकरे ही घरी आले. मात्र एक कालवड तिथेच राहिली. कालवड घरी न आल्याने पुन्हा तेथे जाऊन पाहीले असता तिला बिबट्याने ठार केल्याचे लक्षात आले. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी सायंकाळी पारांबे गावचे शेतकरी शंकर गणपत वाघमारे हे आपली जनावरे चारून घरी घेऊन येत असताना सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घराशेजारी वाटेत अचानक बिबट्याने शेळीवर अचानक हल्ला केला. आरडाओरड केल्याने बिबट्या पळुन गेला. मात्र शेळी गंभीर जखमी झाली. बिबट्यांच्या वाढत्या वावराने परिसरातील शेतकरी चितांग्रस्त झाला आहे. अद्याप वनविभागाने कोणतेही पंचनामे केले नाहीत.