येणके येथे दोन पिंजरे, ट्रप कॅमेरे लावत शोधमोहिम
प्रतिनिधी/ कराड, कोयनावसाहत
कराड तालुक्यातील येणके येथे सोमवारी बिबटय़ाने ऊसतोड मजुराच्या चार वर्षांच्या मुलाचा बळी घेतल्याने संपुर्ण जिल्हा हादरला. या घटनेचे पडसाद येणके परिसरावर कायम असून ग्रामस्थांच्या चेहरयावर भितीचे सावट मंगळवारीही कायम होते. दरम्यान सोमवारी ज्या वनविभागाविरोधात येणके ग्रामस्थांसह ऊसतोड मजूर आक्रमक झाले होते त्या वनविभागाने गेल्या 48 तासापासून येणके, किरपेसह परिसरात मॅरेथॉन शोधमोहिम राबवत बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी ‘ट्रप’ लावला आहे.
एका चिमुकल्या बालकाचा बळी घेणारा बिबटय़ा पकडण्यासाठी दोन पिंजरे आणि ट्रप कॅमेरे लावण्यात आले आहेत. शिवाय वनविभागाचे पथक पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने दिवसरात्र पायपीट करत आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी 15 नोव्हेंबर रोजी सकाळी येणके परिसरात हलकल्लोळ माजवणारी घटना घडली.
येणके-किरपे रस्त्यावरून ऊसतोडणीसाठी निघालेल्या मजूरांच्या टोळीतील चार वर्षांच्या मुलावर बिबटय़ाने हल्ला चढवला. ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने चार वर्षांच्या आकाश भिल यास ओढत नेऊन त्याचा बळी घेतला. आकाश आईच्या बोटाला धरून चालत असताना बिबटय़ाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. या घटनेने ऊसतोड मजुरांनी आरडाओरडा करत आकाशचा शोध घेतला मात्र काही अंतरावर तो मृतावस्थेत आढळून आला.
घबराट अन् भितीची छाया कायम
येणके परिसरात सोमवारी घडलेल्या घटनेनंतर घबराटीचे वातावरण होते. मंगळवारी येणके, किरपे परिसरासह शेजारची गावात घबराट कायम होती. कारण या परिसरातील कितीतरी कुटूंबे दररोज शेतात कामासाठी जातात. सध्या शाळांना सुट्टय़ा असल्याने लहान मुलेही शेतांमधे भटकत, खेळत असतात. मात्र कालच्या घटनेने या परिसरातील भितीची छाया कायम असल्याचे दिसून आले. एका चिमुकल्या मुलाचा बळी गेल्यानंतर अखेर वनविभागाला जाग आली आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी सतर्क झाले असून त्यांनी बिबटय़ाच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
48 तासांची मॅरेथॉन शोधमोहिम
येणके परिसरात बिबटय़ाने एका चिमुकल्याला संपवल्यानंतर खडबडून जागा झालेल्या वनविभागाने सलग 48 तास मॅरेथॉन शोधमोहिम राबवली आहे. बिबटय़ाचा वावर असलेल्या दोन महत्त्वाच्या ठिकाणी पिंजरे लावले आहेत. शिवाय ट्रप कॅमेरे लावून बिबटय़ाच्या हालचाली टिपण्याचा वनविभागाचा प्रयत्न सुरू आहे. येणकेसह परिसरातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सुचना वनविभागाकडून दिल्या जात आहेत. वनविभागाच्या या शोधमोहिमेत काही युवकांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला आहे.सातारा उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वनक्षेत्रपाल तुषार नवले यांच्यासह वनविभागाचे अधिकारी ठाण मांडून आहोत.
मृत आकाशच्या कुटूंबियांना मदतीच्या हालचाली
बिबटय़ाच्या हल्ल्याच अवघ्या चार वर्षांच्या पोटच्या गोळ्याचा दुर्दैवी अंत झाल्याने त्याच्या आई वडिलांचा आक्रोश अजुनही सुरूच आहे. त्यांना या घटनेचा प्रचंड धक्का बसला आहे. दरम्यान वनविभागाने या कुटूंबाच्या आर्थिक मदतीसाठी हालचाली सुरू केल्या असून त्यांना तातडीची मदत मिळावी म्हणून कागदपत्रांची जुळवाजुळव मंगळवारी सुरू होती. मात्र चिमुकला आकाश गेल्याच्या दुःखातून हे कुटूंब अद्यापही सावरलेले नाही. या घटनेनंतर अनेक ऊसतोड मजुरांनी हा परिसर सोडून अन्यत्र वास्तव्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
बिबटय़ाचा शोध लावण्याचे आव्हान
बिबटय़ाने कराड तालुक्यात यापुर्वीही शेतकरी, महिला, बालकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी एका बालकाचा तर बळी गेला. त्यामुळे बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. घडलेल्या घटनेमुळे वनविभागावर ग्रामस्थांचा रोष असून हा रोष कमी करण्यासाठी वनविभागाला बिबटय़ाला पकडण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे. त्यासाठी योग्य त्या उपाययोजनांचा वापर करून बिबटय़ाला जेरबंद करण्याचे आव्हान वनविभाग पेलेल का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.